• Fri. Jun 5th, 2026

    ताशी ५० ते ६० वेगाने वारे, पूर्वमान्सूनच्या सरींनंतर मेघगर्जनेसह कोसळणार; महाराष्ट्रात कुठे-कुठे पावासची शक्यता?

    ताशी ५० ते ६० वेगाने वारे,  पूर्वमान्सूनच्या सरींनंतर मेघगर्जनेसह कोसळणार; महाराष्ट्रात कुठे-कुठे पावासची शक्यता?

    Monsoon Update: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर्वमान्सूनच्या सरी बरसत असून सोमवारीही काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस होणार आहे. मान्सूनचे आगमन लांबणीवरच असल्यामुळे या हलक्या पावसाने नागरिकांना दिलासा मिळत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, मुंबई/नाशिक: मे महिन्याच्या अखेरच्या दिवशी मुंबईकरांना पावसाने सुखद धक्का दिला. नैऋत्य मोसमी पावसाच्या अधिकृत आगमनापूर्वीच रविवारी सकाळी शहरासह उपनगरांमध्ये पूर्वमान्सूनच्या सरी कोसळल्या. पहाटेपासून दाटून आलेले ढग, गार वारा आणि त्यानंतर झालेल्या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला. तर, कल्याणमध्येही पहाटे पावसाने जोरदार हजेरी लावली.

    मुंबईत रविवारी पाऊस

    रविवारी सकाळी पवई, कुर्ला, शीव, दादर, माटुंगा, घाटकोपर, विक्रोळी, सांताक्रूझ, दहिसर आदी भागांत हलक्या ते मध्यम पाऊस झाला. काही भागांत पावसाचा जोर वाढल्याने रस्त्यांवर पाण्याचे प्रवाह दिसून आले. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, सकाळी ६ ते ९ या तीन तासांत शहर विभागात सरासरी ०.६१ मिमी पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरांमध्ये सरासरी ५ मिमी, तर पश्चिम उपनगरांमध्ये २ मिमी पाऊस पडला. चेंबूरमधील कलेक्टर्स कॉलनी महापालिका शाळा परिसरात सर्वाधिक २७ मिमी पावसाची नोंद झाली. मानखुर्द अग्निशमन केंद्र आणि वैभवनगर महापालिका शाळा परिसरात प्रत्येकी २२ मिमी, महाराष्ट्रनगर महानगरपालिका शाळेत १७ मिमी पाऊस झाला. पश्चिम उपनगरांमध्येही बीकेसी अग्निशमन केंद्र परिसरात २२ मिमी, सांताक्रूझ स्वच्छता कार्यशाळा परिसरात १७ मिमी, तर गजदरबंध वादळपाणी उपसा केंद्र परिसरात १२ मिमी पावसाची नोंद झाली.

    ४ दिवस यलो अलर्ट

    भारतीय हवामान विभागाने मुंबईतील काही भागांत १ जून ते ४ जूनदरम्यान मेघगर्जनेसह हलक्या पावासाची शक्यता वर्तवली आहे. शहरता यलो अलर्ट देण्यात आला आहे. पण तरी मान्सून अद्याप लांबणीवरच राहिल. मुंबईत 11 जूनपासून मोसमी पावसाला सुरूवात होईल असा अंदाज आहे.

    सोमवारी नाशिकमध्ये मुसळधारेची शक्यता

    जिल्ह्यात सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यासह घाटमाथ्यासाठी भारतीय हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, काही ठिकाणी ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

    अरबी समुद्रातून येणारे दमट वारे आणि वातावरणातील वाढलेली आर्द्रता यामुळे उत्तर महाराष्ट्र, घाटमाथा आणि लगतच्या भागांत पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, तसेच पश्चिमेकडील डोंगराळ पट्ट्यात जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वी शनिवार आणि रविवारी पावसाचा यलो अलर्ट दिला होता. रविवारी (दि. ३१) सायंकाळपासून पुन्हा सोमवारी दिवसभराकरिता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. याशिवाय २ ते ४ जून या काळात यलो अलर्ट असणार आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा