• Sat. Jun 6th, 2026
    OBCसाठी आम्ही ढेकळात बसू! Manoj Jarange यांच्या उपोषणानंतर Laxman Hake यांचा प्रतिआंदोलनाचा इशारा, मराठा-ओबीसी संघर्ष वाढण्याची चिन्हे

    Laxman Hake: मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झाले आहेत. ‘जरांगे बाजेवर बसले तर आम्ही ढेकळात बसू’ असा इशारा देत त्यांनी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे शेतात बाज टाकून ते आंदोलन करत आहेत. मात्र, या आंदोलनानंतर आता ओबीसी समाजातील नेतेही आक्रमक झाले असून आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रतिआंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. जरांगे यांच्या आंदोलनामुळे ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणाला धक्का बसणार असेल, तर ओबीसी समाज शांत बसणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

    “उद्यापासून राज्यभरातील ओबीसी बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन सुरू करण्यात येईल. जरांगे बाजेवर बसून आंदोलन करत असतील, तर आम्ही ढेकळात बसून आंदोलन करू,” असे हाके यांनी म्हटले आहे. आंदोलनाची तारीख, वेळ आणि ठिकाण याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत जाहीर केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

    ओबीसी महासंघाची ‘वेट अँड वॉच’ भूमिका

    दरम्यान, डॉ. बबनराव तायवाडे यांनीही ओबीसी समाजाच्या भूमिका स्पष्ट करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचे त्यांनी सांगितले.

    Maharashtra TimesPrajakt Tanpure: भाजपात जाताच प्राजक्त तनपुरे अ‍ॅक्शन मोडमध्ये; मंचावरूनच सांगितलं पुढचं मिशन, NCPतील घडामोडींवरही थेट बोलले

    “मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, मात्र ओबीसी आरक्षणातून कोणताही हिस्सा देऊ नये. ओबीसींच्या हक्कांवर गदा आली, तर समाज रस्त्यावर उतरेल,” असे तायवाडे यांनी म्हटले आहे.

    ‘ओबीसी मंत्रालयाला मराठा नाव जोडल्यास विरोध’

    तायवाडे यांनी राज्य सरकारलाही इशारा दिला आहे. “ओबीसी मंत्रालयाला मराठा नाव जोडण्याचा निर्णय घेतला, तर ओबीसी समाज तीव्र विरोध करेल. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर हे मंत्रालय मिळाले आहे. सरकार मराठा आरक्षणाबाबत कोणता मसुदा तयार करते, याकडे आमचे लक्ष आहे. त्या मसुद्यात ओबीसींच्या अधिकारांवर परिणाम होत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

    आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार?

    मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर मराठा आणि ओबीसी संघटनांमधील भूमिका पुन्हा समोर येऊ लागल्या आहेत. एका बाजूला मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र होत असताना, दुसऱ्या बाजूला ओबीसी संघटनांनीही आपली भूमिका कठोर केल्याने राज्यातील आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा