• Mon. Jun 15th, 2026
    Rohit Pawar: तपास होणारच नसेल तर, CID कार्यालयाला टाळे ठोका! दादांच्या अपघात प्रकरणावरुन रोहित पवार आक्रमक

    Rohit Pawar Angry: या प्रकरणात ठोस कारवाई आणि तपासातील प्रगती अहवाल सादर केलेला नाही,’ अशी टीका रोहित पवार यांनी केली.​

    रोहित पवार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यू प्रकरणात चार महिन्यांनंतरही राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ठोस माहिती आणि तपासातील प्रगती अहवाल सादर केलेला नाही; त्यामुळे ‘तपास होणारच नसेल, तर ‘सीआयडी’च्या कार्यालयाला टाळे ठोका,’ अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी केली.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली होती. या अनुषंगाने ठोस कारवाई न झाल्याने रोहित पवार यांनी कुलूप घेऊन ‘सीआयडी’ कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ‘सीआयडी’वर टीकेची झोड उठवली. ‘विमान अपघात प्रकरण अत्यंत संवेदनशील असूनही ‘सीआयडी’कडून अतिशय संथ गतीने तपास सुरू आहे.

    Maharashtra TimesVidhan Parishad : पुण्यात पुन्हा राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी! पवारांनी सूचना देताच कार्यकर्ते कामाला, महायुतीला ‘महागात’ पडणार?
    ‘राज्यातील महत्त्वाच्या नेत्याचा विमान अपघातात मृत्यू झाला असून, त्यामागचे सत्य अद्याप बाहेर आलेले नाही. या प्रकरणाचा तपास नेमका कोणत्या दिशेने सुरू असून, त्यामध्ये किती प्रगती झाली, याची माहिती जनतेला मिळायला हवी. मात्र, तपास यंत्रणा अकार्यक्षम असून, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कुलूप घेऊन आंदोलन केले,’ असे पवार म्हणाले.

    ‘तपास ‘सीबीआय’कडे द्या’
    ‘सीआयडी’मार्फत केल्या जाणाऱ्या तपासाबद्दल यापूर्वी शंका उपस्थित केली जात नव्हती; परंतु आता परिस्थिती बदलली आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाच्या तपासाची माहिती घेण्यासाठी चार महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत; त्यामुळे अजित पवार विमान अपघाती मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात यावा,’ अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

    Maharashtra TimesPimpri Chinchwad Crime : ‘कमावते पुरुष गेले, आता मुलांना कसं मोठं करायचं?’, पुण्यातील विषारी दारु प्रकरणात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
    तपास योग्य दिशेने सुरू
    अजित पवार विमान अपघात मृत्यू प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. ‘सीआयडी’कडून विविध विभाग; तसेच संस्थांशी संपर्क साधण्यात आला आहे. विविध यंत्रणांकडून तपासाच्या अनुषंगाने लागणारी माहिती आणि अहवाल मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे,’ अशी माहिती ‘सीआयडी’च्या अधिकाऱ्यांनी दिली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा