• Sat. Jun 6th, 2026

    Nashik Crime: महिलांच्या टोळीने लुटले वृद्धेचे दागिने; पिण्याच्या पाण्यातून दिले गुंगीचे औषध, नाशिक जिल्हा रुग्णालयाबाहेरील घटना

    Nashik Crime: महिलांच्या टोळीने लुटले वृद्धेचे दागिने; पिण्याच्या पाण्यातून दिले गुंगीचे औषध, नाशिक जिल्हा रुग्णालयाबाहेरील घटना

    Nashik Crime: शहरात परजिल्ह्यातील लुटारू टोळी सक्रिय झाल्याची भीती व्यक्त होत आहे. पोलिस सध्या रुग्णालयाबाहेरील आणि सराफ बाजारातील ‘सीसीटीव्ही’ फुटेजच्या आधारे संशयित महिलांचा शोध घेत आहेत.

    नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: जिल्हा सामान्य रुग्णालयातून पायदुखीचे औषध घेऊन बाहेर पडणाऱ्या ६४ वर्षीय वृद्धेला दोन अनोळखी महिलांनी पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध देत बेशुद्ध केले आणि त्यांच्या अंगावरील तब्बल दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    नाशिकच्या चुंचाळे शिवार परिसरातील लताबाई आबाजी लभडे (वय ६४) या पायदुखीच्या त्रासावर उपचार घेण्यासाठी बुधवारी (दि. २०) दुपारी नेहमीप्रमाणे जिल्हा रुग्णालयात आल्या होत्या. औषधे घेऊन त्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर पडत असतानाच, तिथे दोन संशयित महिलांनी त्यांना गाठले. ‘आम्ही बाहेरगावचे असून नाशिकमध्ये नवीन आहोत. आम्हाला येथील सोनाराचे दुकान माहीत नाही’, असा बहाणा त्यांनी केला. लताबाई यांनी त्यांना रिक्षा करून सराफ बाजारात जाण्याचा सल्ला दिला. मात्र, संशयित महिलांनी भावनिक साद घालत लताबाईंचा विश्वास संपादन केला आणि त्यांना सोबत येण्यास भाग पाडले. त्यानंतर तिघीही रिक्षाने सराफ बाजारातील ‘अभोणकर ज्वेलर्स’ येथे गेल्या.

    Maharashtra TimesNashik Crime : मॉडर्न मुलगी अचानक पंजाबी ड्रेसमध्ये, विशिष्ट महिन्यात उपवास, कुटुंबाला संशय, ‘द नाशिक स्टोरी’चा कॉलेजपासूनचा प्रवास उघड
    तिथे गेल्यावर एका महिलेने सोनाराकडे सोन्याचे मणी मोडण्याबाबत केवळ नाटक केले. ‘आम्ही नंतर येतो’, असे दुकानदाराला सांगून त्या महिला लताबाईंना सोबत घेऊन पुन्हा जिल्हा रुग्णालयात आल्या. पायदुखीने व्याकुळ झालेल्या लताबाईंना या धावपळीत प्रचंड तहान लागली होती. हीच संधी साधून संशयित महिलांपैकी एकीने स्वतःजवळील बाटलीतील पाणी लताबाईंना पिण्यास दिले. मात्र, या पाण्यात गुंगीचे औषध मिसळलेले होते.

    पाणी पिताच लताबाईंना चक्कर आली आणि त्या तिथेच बेशुद्ध पडल्या. काही वेळाने लताबाईंची गुंगी उतरली. त्यांना दोन्ही महिला गायब असल्याचे दिसले. त्यांनी स्वतःची तपासणी केली असता, गळ्यातील १० ग्रॅमची सोन्याची पोत आणि कानातील ५ ग्रॅमची सोन्याची कर्णफुले असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याचे समजताच लताबाईंनी तातडीने सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    Maharashtra TimesNashik Leopard Attack: जांभळाच्या झाडावर दबा… अन् तासाभरात दोन हल्ले! बोरखिंडमध्ये बिबट्याचा थरार; हिमतीने वाचला जीव
    सीसीटीव्हींची पाहणी
    संशयित महिला परजिल्ह्यातील एखाद्या संघटित लुटारू टोळीच्या सदस्य असण्याची दाट शक्यता आहे. अशा प्रकारची टोळी शहरात सक्रिय झाल्याा अंदाज वर्तविला जात आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा