Pune rickshaw driver attack: पुण्यातील नवले ब्रिज परिसरात प्रवासी घेण्याच्या वादातून रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून पुलावरून खाली फेकल्याची धक्कादायक घटना घडली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुण्यातील नवले ब्रिज परिसरात रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून पुलावरून खाली फेकल्याच्या धक्कादायक प्रकरणात पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. प्रवासी घेण्याच्या वादातून हा जीवघेणा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बापूसो बाळासाहेब भोसले, गणेश हरिभाऊ धारपले आणि गणेश उर्फ भावड्या हरिभाऊ धरपाळे या तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली होती. व्हिडिओ समोर आल्यानंतर काही तासांतच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
प्रवासी घेण्याच्या वादातून हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज ते नवले ब्रिज महामार्ग परिसरात प्रवासी घेण्यावरून रिक्षाचालकांमध्ये वाद झाला होता. हा वाद काही क्षणांतच विकोपाला गेला. आरोपींनी सुरज माणिक काळे या रिक्षाचालकाला रस्त्यात अडवून मारहाण करण्यास सुरुवात केली. लाथाबुक्क्यांसह धारदार शस्त्र आणि इतर वस्तूंनी हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे.
जखमी चालकाला पुलावरून खाली फेकलं
मारहाणीनंतर आरोपींनी गंभीर जखमी झालेल्या सुरज काळे यांना राजमाता भुयारी मार्गाजवळील पुलावरून खाली फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Majhi Kanya Bhagyashree Yojana : लेकीच्या जन्माचा गोडवा वाढवणारी ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना; मिळते 50 हजारांची मदत, असा घ्या लाभ
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये काही जण एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. स्थानिकांच्या माहितीनुसार, नवले ब्रिज परिसरात प्रवासी उचलण्यावरून रिक्षाचालकांमध्ये वारंवार वाद होत असतात. मात्र यावेळी हा वाद थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा