पी. व्ही. कुलकर्णी याला सीबीआयने गुरुवारी ताब्यात घेऊन दिल्लीला नेले होते. त्याला अटक करण्यात आली. प्रा. कुलकर्णीनेच केमिस्ट्रीचे प्रश्न फोडून विद्यार्थ्यांना दिले, असा दावा सीबीआयने केला. दरम्यान, नीट प्रकरणात लातूर शहरातील क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांची शुक्रवारी सकाळी ८ पासून ९ तास त्यांच्या घरातच सीबीआय पथकाने चौकशी केली. दुसरीकडे २१ जून रोजी पुन्हा नीट परीक्षा कागद-पेन्सिलवर तर पुढील वर्षी ही परीक्षा ऑनलाइन होईल, असे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जाहीर केले. त्यामुळे त्याच दिवशी होणारी टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) २८ जूनला होणार आहे. लातूर येथून सायंकाळी ५.१५ वाजता सीबीआयचे पथक, काही दस्तऐवज ताब्यात घेऊन गेले. यानंतर सीबीआयचे पथक लातूरमध्येच तळ ठोकून असल्याचे समोर येत आहे.
प्रा. कुलकर्णीने आणि मनिषा वाघमारे यांनी मिळून पुण्यात विद्यार्थ्यांना प्रश्न, उत्तरे तोंडी सांगितली. नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांनी पुणे येथे कुलकर्णी यांच्या राहत्या घरी विद्यार्थ्यांची जुळवाजुळव करून या पेपरचा सराव करून घेतल्याची माहिती आहे.
सीबीआय तपासात असं समोर आलं आहे की, एनटीए परीक्षा प्रक्रियेतील पेपरसेटर आणि रसायनशास्त्राचा प्राध्यापक असलेला पी. व्ही. कुलकर्णी एप्रिल अखेर पुण्यात होता. त्याने पुण्यातून अटक केलेल्या मनीषा वाघमारे या महिलेच्या मदतीने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात काही विद्यार्थ्यांना स्वतःच्या घरी एकत्र केले. त्यांच्यासाठी विशेष शिकवणी वर्ग घेतले.
खाजगी शिकवणीच्या संचालकाची सीबीआयकडून नऊ तास चौकशी
लातूरच्या एका खासगी शिकवणी संचालकाच्या विरोधात एका पालकाने रसायनशास्त्र विषयाचे ४२ प्रश्न हे नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत आल्याची तक्रार दिली होती. लातूर येथील नामांकित खाजगी शिकवणीचे संचालक यांच्या राहत्या घरी सीबीआयने सकाळी सहा वाजता धाड टाकून त्या संचालकाची कसून चौकशी केली आहे. या चौकशीत प्रामुख्याने मोबाईल फोन, कम्प्युटर, हार्ड डिस्क, बँक तपशील व इतर कागदपत्रांची तपासणी केली. यानंतर खाजगी शिकवणीच्या कार्यालयात जाऊन ही कागदपत्रांची जुळवाजुळाव करताना सीबीआयचे अधिकारी दिसून आले. तब्बल नऊ तासाच्या सखोल चौकशीनंतर कागदपत्रांचा मोठा गठ्ठा घेऊन सीबीआयचे अधिकारी खाजगी शिकवणीच्या संचालकाच्या घराच्या बाहेर पडले. मात्र अद्याप त्यांचा या प्रकरणाशी संबंध आहे की नाही याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
लातूर पॅटर्नची निर्मिती कशी?
1985 ते 87 दरम्यान लातूर जिल्ह्यातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन लातूर मधील अनेक शिक्षकांनी व प्राध्यापकांनी मिळून या पॅटर्नची सुरुवात केली. यानंतर लातूर पॅटर्न उदयास येण्यास एक दशकाचा काळ लोटला. त्यानंतर दहावी आणि बारावी दोन्ही बोर्ड परीक्षेच्या वेळी लातूर विभागाचा निकाल हा चांगला येत असल्यामुळे लातूर पॅटर्नची निर्मिती झाली. यानंतर राज्यातील अनेक विद्यार्थी लातूर पॅटर्नमध्ये प्रवेश घेण्यासाठी उत्सुक झाले. मात्र लिमिटेड जागा महाविद्यालयात असल्या कारणाने प्रत्येक विद्यार्थ्याला लातूरमध्ये प्रवेश मिळणे कठीण झाले. यानंतर लातूर शहरात खाजगी शिकवण्याची सुरुवात झाली. यामध्ये राज्यातील कोणत्याही शहरात कॉलेजचे अॅडमिशन घेऊन लातूर येथील खाजगी शिकवणीत प्रवेश मिळवून घेऊ लागले. मात्र यामुळेच लातूर पॅटर्नचे जनक हे एका बाजूला राहिले आणि पैशाच्या जोरावर लातूर पॅटर्न हा खाजगी शिकवणीचा पॅटर्न बनला.
“लातूर पॅटर्न’ हे बावनकशी सोनं आहे, काही विकृत प्रवृत्तींमुळे त्याचे अस्तित्व संपणार नाही”
नीट पेपरफुटी प्रकरणात लातुरातील प्राध्यापकाचे नाव आल्यानंतर याबाबत आता विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. “अलीकडच्या काळात महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर पेपरफुटीच्या काही दुर्दैवी घटना घडल्या आणि त्यात लातूरचे नाव जोडले गेले. २०२४ मध्येही अशा घटनांनंतर जेव्हा फेरपरीक्षा झाली, तेव्हा वैद्यकीय प्रवेशांमध्ये (Medical Admissions) सर्वाधिक विद्यार्थी लातूरचेच होते, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे २०२६ मध्येही काही संशयास्पद घटना घडल्या किंवा काही लोकांना अटक झाली, तरी त्याने ‘लातूर पॅटर्न च्या मूळ गुणवत्तेला तीळमात्र धक्का पोहोचणार नाही. पैशाच्या मोहापोटी असे कृत्य करणाऱ्या काही विकृत लोकांमुळे संपूर्ण लातूर पॅटर्न संपला, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे ठरेल,” असं लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य महादेव गव्हाणे यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे, “NEET पेपर फुटीप्रकरणी लातूरचे नाव जोडले गेले याचं एक लातूरकर म्हणून दुःख आहे. लातूरची उज्वल शैक्षणिक परंपरा एका झटक्यात धुळीस मिळाली. लातूर पॅटर्न बनला तो येथील शाळा, महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ यांच्या अथक परिश्रमातून. मात्र गेल्या काही वर्षांपासून शिक्षणाच्या या पंढरीत खासगी शिकवणूक चालकांची घुसखोरी चिंता वाढवणारी ठरली. साम दाम दंड या सर्व मार्गांचा अवलंब करीत या खासगी शिकवणूक चालकांनी लातूर पॅटर्न बदनाम केला आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. वेळीच यावर निर्बंध घातले तरंच आपला शैक्षणिक लातूर पॅटर्न तग धरेल,” असं सामाजिक कार्यकर्ते सतीश तांदळे यांनी म्हटलं आङे.
“दोष एनटीएचाच”
नीट पेपरफुटी प्रकरणात ज्येष्ठ पत्रकारांनी व्यवस्थेला खडेबोल सुनावले आहेत. “देशातील 23 लाख पोरांच्या स्वप्नांवरून नांगर फिरविणाऱ्या नीट २०२६ च्या पेपरफुटी प्रकरणी लातूर येथील सेवानिवृत्त प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यांना सीबीआयने अटक केली आहे. हे कुलकर्णी लातूर येथील एका नामांकित महाविद्यालयात चार-पाच वर्षांपूर्वी रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. शासकीय सेवेत असताना ते बोर्डाचे व सीईटीचे पेपर सेटरही होते. रिटायर झाल्यानंतर कोणाचा कंट्रोलच नसतो. रिटायर झाल्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने त्यांच्यावर रसायनशास्त्राच्या पेपर सेटर ची जबाबदारी सोपवली. जोपर्यंत ते शासकीय सेवेत होते तोपर्यंत त्यांना पेपर सेट करण्याची जबाबदारी द्यायला हवी होती म्हणजे त्यांच्यावर कंट्रोल राहिला असता. रिटायरमेंट नंतर कंट्रोलच नसल्याने त्यांना ही अवदसा आठवली असावी. पेपर फुटीचा दोष द्यायचाच झाला तर माझ्या मते तो एनटीएलाच द्यायला हवा,” असं लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांनी म्हटलं आहे.