• Sat. Jun 13th, 2026

    वाढवण बंदराचं भविष्य धोक्यात? जमीन संपादन प्रक्रियेत दिशाभूल, 40 हजार झाडांची कत्तल; अनेक आरोपांमुळे प्रकल्पाला विरोध

    वाढवण बंदराचं भविष्य धोक्यात? जमीन संपादन प्रक्रियेत दिशाभूल, 40 हजार झाडांची कत्तल; अनेक आरोपांमुळे प्रकल्पाला विरोध

    Vadhvan Port Land Acquisition: पालघर येथे वाढवण बंदरासाठी जमीन संपादन प्रक्रिया सुरू झाली असताना प्रशासन दिशाभूल करत असल्याचे अनेक आरोप केले जात आहेत. तसेच, 40 हजार झाडांचा बळी जाणार असल्यामुळे प्रकल्पासाठी विरोध वाढत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा/विशेष प्रतिनिधी, पालघर: प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पासाठी जमीन संपादन प्रक्रियेत जिल्हा प्रशासन जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने केला आहे. वरोर येथील सर्व्हे क्रमांक ७५० (गोळा ब्लॉक) संदर्भात प्रशासनाचे दावे वस्तुस्थितीशी विसंगत असून, यात तांत्रिक व आर्थिक अनियमितता असल्याचा दावा समितीने केला आहे.

    समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, प्रशासनाने या जमिनीशी संबंधित केवळ १२४ जमीनमालकांचा उल्लेख केला आहे. मात्र प्रत्यक्षात या सर्व्हे क्रमांकातील खातेदार व वारसदारांची संख्या अधिक असल्याचे समितीचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी वारस नोंदी पूर्ण नसतानाही मोजक्या लोकांच्या संमतीच्या आधारे ‘सर्वानुमते संमती’ असल्याचे चित्र निर्माण केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    Maharashtra TimesWeather Alert: पारा चाळीशीपार पोहोचला असताना पाऊस परतणार! नागरिकांना दिलासा मिळणार; 16 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ‘अलर्ट’

    दरम्यान, प्रशासनाने जमीनमालकांनी स्वेच्छेने ताबा दिल्याचा दावा केला होता. मात्र संघर्ष समितीच्या म्हणण्यानुसार, काही जमीनमालकांनी अशा कोणत्याही चर्चेबाबत अनभिज्ञता दर्शवली आहे. त्यामुळे प्रशासनाची माहिती दिशाभूल करणारी असल्याचा आरोप पुन्हा करण्यात आला आहे. दरम्यान, केवळ कागदोपत्री आकडेवारी सादर करून प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असा इशारा समितीने दिला आहे. प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा समितीचे अध्यक्ष नारायण पाटील व सचिव वैभव यांनी दिला आहे.

    तांत्रिक गुंतागुंत आणि आदिवासी प्रश्न

    सर्व्हे क्रमांक ७५० हा ‘गोळा ब्लॉक’ असून त्याचे सीमांकन अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे समितीने म्हटले आहे. स्वतंत्र मोजणी व हक्क निश्चितीपूर्वी ताबा घेणे बेकायदेशीर ठरू शकते, असा दावा करण्यात आला आहे. याशिवाय, या भागात दीर्घकाळ राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांच्या पुनर्वसनाबाबत प्रशासनाने कोणतीही स्पष्ट भूमिका मांडलेली नसल्याचा आरोप आहे.

    नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी नोंदवाव्यात

    पालघर जिल्ह्यातील भूसंपादन प्रक्रियेत महसुली नोंदी अद्ययावत नसल्याने मोबदला वितरणात अडचणी येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी इंदू राणी जाखर यांनी दिली. गावनिहाय शिबिरे घेऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू असून, आतापर्यंत १८०० कोटींचा निवाडा जाहीर करण्यात आला आहे. संघर्ष समितीकडून अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप करत नागरिकांनी थेट प्रशासनाकडे तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

    मोबदल्यात गैरप्रकाराचा आरोप

    जमिनीच्या मूल्यांकन प्रक्रियेवरही समितीने प्रश्न उपस्थित केले आहेत. काही ठिकाणी प्रत्यक्षात झाडे नसतानाही ती असल्याचे दाखवून मोबदला वाढवण्यात येत असल्याचा आरोप समितीने केला आहे. तसेच ओळखीच्या व्यक्तींना लाभ मिळावा यासाठी मोबदल्यात फेरफार होत असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे. यामुळे मूळ जमीनमालकांच्या हक्कांकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

    Maharashtra TimesMumbai News: मुंबईतील 70 वर्षे जुनी चाळ जमीनदोस्त होणार, निरोप घेताना रहिवाशांचे डोळे पाणावले; शिवडी-वरळी उन्नत मार्गाचा मार्ग मोकळा

    ‘बंदरासाठी ४० हजार झाडांचा बळी नको’

    पालघरच्या महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पासाठी केंद्र सरकारने जंगल क्षेत्राचा वापर करण्यास तत्त्वतः मंजुरी दिल्यानंतर पर्यावरणप्रेमींनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे. हा प्रकल्प तब्बल २३७ हेक्टर जंगल जमिनीवर उभारला जात असून यासाठी जवळपास ४० हजार झाडांची कत्तल होणार आहे. यात सुमारे १६०० खारफुटींचाही समावेश आहे. मात्र हा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशील असल्याने प्रस्तावित वाढवण बंदरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होईल, याकडे पर्यावरणप्रेमींनी लक्ष वेधले आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा