• Fri. Jun 5th, 2026
    ‘Nida Khan हिची निर्दोष सुटका होईल; हा सुशिक्षित मुस्लीम तरुणांना त्रास देण्याचा प्रयत्न’, ओवेसींचा गंभीर आरोप

    निदा खान अटक प्रकरणावर एमआयएमचे प्रमुख नेते असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली. ओवेसी यांनी निदा खान हिची बाजू घेतली आहे. निदा ही कोर्टाकडून निर्दोष सुटेल, असा दावा ओवेसींनी केला. तसेच सुशिक्षित मुस्लीम तरुणांना त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोपदेखील ओवेसी यांनी केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    छत्रपती संभाजीनगर : एमआयएम पक्षाचे प्रमुख नेते असदुद्दीन ओवेसी आज छत्रपती संभाजीनगर शहराच्या दौऱ्यावर आहेत. ओवेसी यांनी आज त्यांच्या पक्षाच्या नगरसेवक आणि प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. निवडणूक आयोगाकडून राबवल्या जाणाऱ्या SIR मोहीमे दरम्यान आपण काय कामे करायची याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ओवेसींनी आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर ओवेसी यांनी नाशिकच्या एका बहुराष्ट्रीय कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याने या प्रकरणातील संशयित आरोप निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिला होता. पोलीस जवळपास महिन्याभरापासून तिला शोधत होते. या प्रकरणी मतीन पटेल याच्यावरही गुन्हा दाखल झालाय आणि त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणावर असदुद्दीन ओवेसी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी आपली भूमिका मांडली.

    “सर्वात पहिली गोष्ट ही आहे की, टीसीएस कंपनीचं स्टेटमेंट आपण पाहिलं असेल की, त्या मुलीचा संबंध एचआर विभागाशी नव्हता. या प्रकरणात 9 एफआयआर रजिस्टर झाले आहेत. त्यापैकी एक एफआयआरमध्ये हर्टिंग रिलेजन सिंटेमेंटच्या नावाने निदा खान या मुलीचे नाव लिहिले गेले. तिसरी गोष्ट म्हणजे एफआयआर दाखल होण्यापूर्वीच या मुलीचे ट्रान्सफर झाले होते. तिचा या कंपनीशी कोणताही संबंध नाही”, असा दावा असदुद्दीन ओवेसी यांनी केला.

    “या प्रकरणातील जो तक्रारदार आहे तो सत्ताधारी पक्षाचा सदस्य आहे. सत्ताधारी पक्षांशी त्याचा संबंध आहे. चौथी गोष्ट म्हणजे सध्या तरी कोणताही निष्कर्ष काढला जाऊ शकत नाही. आम्ही या गोष्टीचं खंडन करतो. काही लोकं या गोष्टीचं मीडिया ट्रायल करत आहेत. मीडिया जर ज्युरीचे काम करणार तर हे धोकादायक आहे”, असं ओवेसी म्हणाले.

    “एफआयरममध्ये लिहिलं आहे की, तिच्या घरातून एक बुर्खा मिळाला. एक नकाब मिळाला. तिसरी वस्तू म्हणजे एक पुस्तक मिळालं. बुर्खा कधीपासून आक्षेपार्ह झाला? नकाब कधीपासून आक्षेपार्ह झाला? केव्हापासून प्रोफेट मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे पुस्तक मिळाले तर ते काय आहे?”, असा सवाल ओवेसी यांनी केला.

    “मी आपल्याला मागे घेऊन जातो. दिल्लीत अशाचप्रकारे मुस्लीम तरुणांना पकडलं होतं. पोलिसांनी काय म्हटलं होतं की, त्यांच्या घरातून मिर्झा गालिबचे पुस्तक मिळाले त्यामुळे ते दहशतवादी आहेत. पण कोर्टाने नंतर त्या गोष्टीला नाकारला. आताच इलाहबाद हायकोर्टाचे एक जजमेंट आलं आहे. कुणीतरी उर्दू शेर लिहिला. तर कोर्टाने सांगितलं की, शेर लिहिला तर काय झालं? त्यामुळे कोर्ट योग्य न्याय देईल”, असं ओवेसी म्हणाले.

    ‘निदा खानची निर्दोष सुटका होईल’, ओवेसींचा दावा

    “या मुलीची कोर्टाकडून निर्दोष सुटका होईल. तिच्यावर कोणतीही केस दाखल होणार नाही. हे सगळं मुस्लीम समाजातील सुशिक्षित तरुणांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला खात्री आहे की, कायदा आपलं काम करेल. तुम्ही कुणाला आरोपी बनवता तर त्याचा अर्थ असा होत नाही की त्याला शिक्षा झाली. आरोप लावणारे आहेत त्यांना कोर्टात पुराव्यानिशी सिद्ध करावं लागेल. त्याशिवाय तुम्ही आरोपी म्हणू शकत नाहीत. जो हा आरोप करत आहेत ते केवळ एका द्वेषापोटी करत आहेत. आता त्या मुलीला अटक करण्यात आली आहे. न्याय प्रक्रिया आपलं काम करेल. कायद्याने जे होईल ते आपल्यासमोर येईल. पण या प्रकरणाला कोणत्या पक्षासोबत जोडणं योग्य नाही”, अशी भूमिका ओवेसी यांनी मांडली.

    पत्रकारांनी यावेळी एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या अटकेबाबत प्रश्न विचारला. त्यावर ओवेसींनी उत्तर दिलं. “कोर्टात आमचा मुलगा त्याचा सामना करेल. यामध्ये कोणतीच अडचण नाही. तो कोर्टात जावून सांगेल. तुम्ही कुणालाही आरोपी करु शकता. मुंबई ट्रेन ब्लास्ट कुणी केला ते सांगा. 80 लोक मारले गेले, आजपर्यंत ते लोकं तडपत आहेत. मालेगाव ब्लास्ट कुणी केला? आजपर्यंत ते लोक तडपत आहेत. ज्यांचे लोकं मारले गेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना अजून न्याय मिळालेला नाही. ज्या लोकांना जेलमध्ये पकडून टाकलं आहे त्या लोकांच्या नातेवाईकांना अजून न्याय मिळालेला नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

    “एवढा उन्माद करु नका. महाराष्ट्राच्या विधानसभेतील किती आमदारांवर गुन्हा दाखल आहे? ते आमदार, खासदार झालेच ना? कायदा काय बोलतो, दोषी आढळत नाही तोपर्यंत आरोपी दोषी ठरत नाही. हे केवळ वातावरण निर्मिती आहे. केवळ ब्रेकिंग न्यूजपुरता मर्यादीत आहे. नंतर सर्व फूस होतं”, असा दावा असदुद्दीन ओवेसी यांनी यावेळी केला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा