• Tue. Jun 16th, 2026
    Vikas Lawande : महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद, राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, काय-काय घडलं? वाचा A टू Z

    महाराष्ट्राच्या राजकारणात आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेवरुन आता दोन मतप्रवाह बघायला मिळत आहेत. तर विकास लवांडे यांचं पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आंदोलन सुरु आहे. या प्रकरणाची A टू Z माहिती आपण जाणून घेऊयात.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक झाल्याच्या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून विकास लवांडे यांच्यावर शाईफेकचा हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केला आहे. विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायात काही घुसखोर घुसल्याचा आरोप करत काही नावे घेतली होती. याच मुद्द्यावरुन वातावरण तापलं आहे. त्यांनी जाहीर केलेल्या यादीत संग्राम भंडारे यांचंदेखील नाव होतं, अशी माहिती समोर येत आहे. विकास लवांडे यांच्यावरील शाई हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत शाईफेक करणारे संग्राम भंडारे हे विकास लवांडे यांना इशारा देताना दिसत आहेत. “आमचं सर्वस्व आहे ते, तू परत आमच्या गुरुवर्यांना बोललास तर तू लक्षात ठेव”, असं कीर्तनकार संग्राम भंडारे व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.

    या घटनेनंतर विकास लवांडे पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल झाले. या प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी त्यांची आहे. आपल्याला पिस्तूल दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, असा देखील आरोप विकास लवांडे यांनी केला आहे. दुसरीकडे कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी विकास लवांडे यांच्या जीवे मारण्याच्या धमकीच्या आरोपांचं खंडन केलं आहे. आपल्याकडे पिस्तूल नसल्याचं संग्राम भंडारे यांनी स्पष्ट केलं आहे. तर विकास लवांडे यांनी संग्राम भंडारे हे खोटे बोलत असून कोणता आरोपी आपल्याकडे पिस्तूल आहे, असं सांगतो? असा सवाल करत आरोप केले आहेत. विकास लवांडे घटनेनंतर नेमकं काय म्हणाले? ते जाणून घेऊयात.

    विकास लवांडे नेमकं काय म्हणाले?

    “माझं आज लोणी काळभोर जवळ हवेली तालुक्यात आळंदी म्हातोबाची या गावात प्रवचन होतं. तुकाराम जवळकर यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने माझी आज प्रवचन सेवा होती. मी सकाळी आज आठ वाजता तिथे गेलो होतो. प्रवचन संपल्यानंतर तिथे आमचे नातेवाईक आहेत. तिथे चहापानी केल्यानंतर पावणे दहाच्या सुमारास गावातून निघालो. गावातून एक किमी बाहेर आल्यानंतर स्मशानभूमीच्या जवळ दोन-तीन गाड्या आल्या. आमच्या गाडीला आडवी लावली आणि आमच्या गाडीला थांबवलं.”

    “एक-दोन जण पुढे आले, बोलायचं आहे म्हणून खाली उतरा म्हणाले. खाली उतरल्यानंतर अचानक दहा-पंधरा जण आले, मला ढकललं आणि स्मशानभूमीच्या आत नेलं. मला रिव्हॉल्वर दाखवत हे बघितलं का काय आहे ते, तुझा आम्ही खात्मा करु. तू आमच्या गुरुमाऊलीवर का बोलला? तुझा आम्ही खात्मा करु, असं म्हणत संग्राम भंडारे यांनी माझ्या अंगावर शाई फेकली.”

    “अक्षय कांचन आणि संग्राम भंडारे या दोन व्यक्तींना मी ओळखलं आहे. बाकी कुणी माझ्या ओळखीचं नव्हतं. मात्र ते सर्व गुंड मला धमकी देत होते की, तुझा आम्ही खात्मा करु. माझ्यावर शाईच्या चार बाटल्या ओतल्या. त्यामध्ये केमिकल होतं. मी चेहरा धुतला आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आलो आहे. या सगळ्यांपासून माझ्या जीविताला शंभर टक्के धोका आहे. कारण गेले काही दिवस सोशल मीडियातून मला अनेक धमक्या आणि फोन आले आहेत.”

    “या धर्मांद विचारांच्या लोकांनी, ज्यांनी संतांना त्रास दिला होता, हा संग्राम भंडारे नथुराम गोडसे, बिष्णोई गँगचे समर्थन करतो, संगमनेरला राडा घातला, तोच संग्राम भंडारे आज दहा-बारा गुंडांना सोबत घेऊन माझ्यावर अचानक असा हल्ला करतोय. रिव्हॉल्वर दाखवून मला तुझा खात्मा करायचा आहे, अशी धमकी दिली आहे. मी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आलो आहे. पोलीस फिर्याद घेत आहेत. त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मी लोणी काळभोर पोलीस ठाणे सोडणार नाही. इथेच मी सत्याग्रह सुरु करणार आहे जोपर्यंत त्यांना अटक होत नाही.”

    विकास लवांडे यांचं पोलीस ठाण्यात सत्याग्रह आंदोलन

    विकास लवांडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात केली आहे. दुसरीकडे शाईफेक प्रकरणी कीर्तनकार संग्राम भंडारे, अक्षय कांचन यांच्यासह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल झाल्याचं वृत्त एका वृत्त वाहिनीने दिलं आहे. पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

    हा वाद नेमका कशामुळे?

    काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामींची घुसखोरी वाढत असल्याचं वक्तव्य केलं होतं. “वारकरी संप्रदायात 60 लोकांची मांडणी ही धर्मांद शक्तींना बळ देणारी आहे. आम्ही आता अशा धर्मांध लोकांची यादी तयार करायला सुरुवात केली आहे”, असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी 20 नावे जाहीर करत संबंधित नावे वारकरी संप्रदायातील कथित घुसखोर असल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपांमुळे नवा वाद निर्माण झाला. यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या. अखेर या वादाचा आज मोठा फुगा फुटला. कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यासह काही जणांनी विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केली.

    मंत्री नितेश राणे यांच्याकडून शाईफेकच्या घटनेचं समर्थन

    दरम्यान, विकास लवांडे यांच्यावरील शाईफेकच्या घटनेचे मंत्री नितेश राणे यांनी समर्थन केलं आहे. नितेश राणे यांनी ‘एक्स पोस्ट’मध्ये संग्राम भंडारे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत आपलं समर्थन जाहीर केलं आहे. “बापू अभिमान आहे, जय श्रीराम”, अशी पोस्ट नितेश राणे यांनी केली आहे.

    रोहित पवार यांचा पोलीस ठाण्यात जाण्याचा इशारा, नेमकं काय म्हणाले?

    “महाराष्ट्राच्या थोर वारकरी संप्रदायात घुसखोरी केलेल्या कट्टरतावाद्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे हे गेल्या काही दिवसांपासून पुराव्यांसह आवाज उठवत आहेत. त्याचाच राग मनात धरून आज विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे आणि त्यांच्या गुंडांनी शाई ओतून केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! या हल्ल्यामुळं विकास लवांडे यांनी केलेले आरोप हे सिद्धच झाले आहेत आणि असे हल्ले हे काही नवीन नाहीत. यापूर्वीही ज्ञानोबा-तुकोबांनाही मनुवादी वृत्तीने असंच छळलं होतं, त्यामुळं या गुंडांच्या हल्ल्याला आम्ही भीक घालणार नाहीत.”

    “या हल्ल्यातील सर्व गुंडांच्या सरकारने तत्काळ मुसक्या आवळाव्यात आणि हा हल्ला करताना लवांडे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळं त्यांना तातडीने पोलीस संरक्षणही पुरवावं, अन्यथा सत्तेच्या आशीर्वादानेच केलेला हा हल्ला आहे, असे आम्ही समजू. यापुढं लवांडे यांना काही झालं तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, याची सरकारने नोंद घ्यावी.”

    “विकास लवांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आज दुपारपर्यंत FIR दाखल झाला नाही तर संध्याकाळी मी स्वतः पोलीस स्टेशनला जाणार… थोर संतांनी दाखवलेला बंधुभावाचा आणि शिव-फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार हाच खरा महाराष्ट्र धर्म असून कोणत्याही कट्टरवाद्यांना, गुंडापुंडांना आणि शिव्या देणाऱ्या मनुवाद्यांना हा विचार आम्ही पुसू देणार नाही…! भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी… – जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज”.

    सुषमा अंधारे यांच्याकडून विकास लवांडे यांचं अभिनंदन, काय म्हणाल्या? वाचा सविस्तर

    “विकास लवांडे जी आपलं मनःपूर्वक अभिनंदन..! कामक्रोधमधमोहमत्सर या पासून संत संप्रदाय प्रचंड लांब असतो. संत तुकोबाराय संत ज्ञानेश्वर यांचा सांप्रत समाजाने अतोनात छळ केला मात्र उपरोक्त संतांनी कधीही कुणाचे अहित चिंतले नाही. माणूस विकार मुक्त झाला पाहिजे यासाठी ते कायम सम्यक विचार मांडत राहिले.”

    “आज आपल्या सोबत जे काही आळंदीत घडले हा एका अर्थाने आपला विजय आहे. कारण वारकरी संप्रदायाच्या नावाखाली झालेली घुसखोरी आणि ज्यांना वारकरी संप्रदायाचा नेमका विचारच कळला नाही अशा नकली लोकांचे बुरखे फाडण्यात आपण यशस्वी झालात. वारकरी संप्रदायामध्ये हिंसक विचारांच्या लोकांची घुसखोरी झाली आहे हे पवार साहेबांचे म्हणणे या मंडळींनी पुन्हा एकदा खरे करून दाखवले.”

    “आता आपण अजून एक काम करूया. अशा लोकांवर पोलीस कारवाई व्हावी किंवा कायदेशीर त्याच्यावर गुन्हे दाखल व्हावे अशी कुठलीही अपेक्षा मागणी आपण कुणीही करू नये. कारण जिथे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा एफ आय आर लिहून घेतला जाऊ शकत नाही आणि यावर त्यांच्याच पत्नी असणाऱ्या उपमुख्यमंत्री, किंवा खासदार मुलगा , चकार शब्दाने बोलू शकत नाही अशा राज्यात आपण आपली एफ आय आर व्हावी यासाठी प्रयत्न करणे शुद्ध वेडेपणा आहे.”

    “उलट जे जे लोक अशा पद्धतीच्या कृती करतात त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या समारंभांमध्ये पहिल्या रांगेच्या खुर्च्यांमध्ये बसवावे. त्यांचे पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण असे पुरस्कार देऊन सत्कार समारंभ घडवून आणावेत. शक्य झालं तर सत्तेतल्या काही लाभाच्या जागा त्यांच्यासाठी उपलब्ध करून देता येतात का? हे सुद्धा बघावे.”

    “प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकणारे असतील किंवा हनुमंत पवारला मारहाण करणारे असतील किंवा तुम्हाला दहापेक्षा दाखवणारे लोक असतील अशा सगळ्या लोकांना अधिकाधिक राजाश्रय कसा मिळेल आणि त्यांचा सत्कार सन्मान कसा होईल यासाठी उलट आपण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे सगळे मिळून मागणी करूया.”

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा