• Sun. Jun 14th, 2026
    Bharat Mandapam In Pune: ‘भारत मंडपम’साठी खैरात; पन्नास टक्के भूखंड व्यावसायिकांना देणारी नियमावली जाहीर

    Bharat Mandapam In Pune: एकीकडे लोहगाव विमानतळानजीक गगनचुंबी इमारती उभारण्यावर मर्यादा आहेत. त्यात या आरक्षणांमुळे जमीन मालकांना मोबादला तरी कितपत मिळणार, हा प्रश्न सरकारने चुटकीशी सोडवला आहे.

    भारत मंडपम्(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    प्रशांत आहेर, पुणे : नवी दिल्लीतील ‘ भारत मंडपम् ’ या आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरच्या धर्तीवर पुण्यातील लोहगाव विमानतळानजीक विविध लोकोपयोगी आरक्षणे असलेल्या ४८.७५ एकर क्षेत्रावर भारत मंडपम् उभारण्यासाठीचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर करताच राज्य सरकारने याबाबतची नियमावली जाहीर करण्याचा ‘मुहूर्त’ साधला आहे. हे नियम तयार करताना हा प्रकल्प उभारणाऱ्या व्यावसायिकांवर सवलतींची उधळण करण्यात आली असून, एकूण क्षेत्राच्या पन्नास टक्के जागा व्यावसायिकांच्या घशात घालण्यास अधिकृत परवानगी देण्यात आली आहे.

    सरकारने जाहीर केलेल्या नियमानुसार जमीन मालकाला एकूण आरक्षित जमिनीपैकी ५० टक्के जमिनीवर ‘भारत मंडपम’ विकसित करण्याची परवानगी देण्यात आली असून, उर्वरित ५० टक्के जमिनीचा वापर निवासी किंवा व्यावसायिक वापरासाठीची मुभा देऊन, ‘राजा उदार झाल्या’चे सरकारने दाखवून दिले आहे. लोहगाव येथील ४१ एकर १९ गुंठे जमिनीवर विकास आराखड्यात क्रीडांगण, हॉस्पिटल, पार्किंग, पाणीपुरवठा, भाजी मार्केट, उद्यान अशी सहा आरक्षणे दर्शविण्यात आली होती.

    Maharashtra TimesWeather Alert: मे महिन्यासाठी हवामान विभागाचा अंदाज जाहीर; महाराष्ट्रात कसं असणार वातावरण? तापमान आणि पावसाबाबत महत्त्वाची माहिती
    येथील सुमारे ४८.७५ एकर क्षेत्रावर ‘भारत मंडपम’ उभारण्याचा एका खासगी कंपनीने दिलेला प्रस्ताव सरकारने अत्यंत गांभीर्याने घेऊन, तशा सूचना पुणे महापालिकेला दिल्या होत्या. पुणे महापालिकेने सुरुवातीला आढेवेढे घेऊन, हा प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र, मुंबईतील बड्या नेत्यांनी डोळे वटारल्यानंतर महापालिका प्रशासन आणि पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी या प्रस्तावाला २३ मार्च रोजी विनाअट मंजुरी देऊन, तो अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवला.

    पुणे महापालिकेने प्रस्तावाला मान्यता देताच सरकारला ‘भारत मंडपम्’सारखा प्रकल्प संपूर्ण राज्यात उभारण्याचा साक्षात्कार झाला आणि त्यासाठीची नियमावली अवघ्या एका महिन्यात तयार करून त्याला तातडीने मान्यताही देण्यात आली. देशात आतापर्यंत केवळ दिल्लीतील प्रगती मैदानावर असलेले ‘भारत मंडपम’ आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्येही साकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    पूर्वीच्या सेंटरचे काय झाले ?
    या पूर्वी सेनापती बापट मार्गावर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यासाठी राज्य सरकारने मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरला वीस वर्षांपूर्वी भूखंड दिला होता. त्या ठिकाणी कागदावर कन्व्हेन्शन सेंटर उभे करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र एका पंचतारांकित हॉटेलच्या एका हॉलला दुसऱ्या बाजूने प्रवेशद्वार दाखवून ते कन्व्हेन्शन सेंटर असल्याचे दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्ष कन्व्हेंशन सेंटरच्या जागेवर एक आलिशान मल्टिप्लेक्स व मॉल उभारण्यात आला आहे. आता या नवीन जागेवर पन्नास टक्के जागेवर इतर सुविधा उभारण्यास परवानगी दिली आहे.

    Maharashtra TimesPune Nasrapur Crime: नसरापूरमधील पीडित मुलीचा पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट पोलिसांच्या हाती; संपूर्ण प्रक्रिया ‘इन कॅमेरा’, तपासाला वेग
    परिषदा, प्रदर्शनांसाठी वापर

    या केंद्रांचा वापर ‘नॅशनल स्ट्रॅटेजी फॉर एमआयसीई इंडस्ट्री २०२२’नुसार केला जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषद, औद्योगिक प्रदर्शन, गुंतवणूक परिषद, सांस्कृतिक महोत्सव आणि व्यावसायिक संमेलनांसाठी ही केंद्रे वापरली जातील, याची दक्षता घेण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही नवी नियमावली बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र वगळता राज्यातील इतर सर्व नियोजन प्राधिकरणांना लागू असेल. त्यामुळे पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पिंपरी-चिंचवडसह आदी शहरे डोळ्यासमोर ठेवण्यात आली आहेत.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा