Dhamangaon Fire Relief Fund : नागपूरच्या धामणगावमध्ये भीषण आगीत ५० घरे खाक झाली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाधितांसाठी अडीच लाखांची मदत, मोफत रेती आणि पुनर्वसन योजना जाहीर केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे घटनास्थळी
या घटनेनंतर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जैस्वाल आणि उमरेडचे आमदार संजय मेश्राम यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बाधित कुटुंबांना धीर देत शासनाकडून सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले.
अडीच लाख रुपयांचा निधी मंजूर
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, जळालेल्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही मदतीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थेच्या माध्यमातून २० लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून त्यातील काही रक्कम तातडीने नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे.
Solapur Crime : वराह पालनाचा वाद विकोपाला, 6 जणांनी दिवसाढवळ्या भर चौकात तरुणाला निर्घृणपणे संपवलं, सोलापूरात दहशत
महिनाभराचे अन्नधान्य अन्…
राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनीही तातडीने २३ हजार रुपयांची शासकीय मदत देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. तसेच घर बांधकामासाठी मोफत रेती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जळालेल्या कागदपत्रांमुळे अडचणीत आलेल्या नागरिकांसाठी विशेष शिबिरे घेऊन आवश्यक कागदपत्रे पुन्हा तयार करून दिली जाणार आहेत. बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी शासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यात महिनाभराचे अन्नधान्य, किचन साहित्य, सिलेंडर, वीज मीटर यांची उपलब्धता करून देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना सायकली व शालेय साहित्यही देण्यात येणार आहे. तसेच घरांचे पुनर्बांधकाम पूर्ण होईपर्यंत प्रभावित कुटुंबांच्या निवासाची तात्पुरती व्यवस्था करण्यात येत आहे. आगीत काही गोठे जळून गेल्याने जनावरांचेही नुकसान झाले आहे. यासाठी गोठ्यांच्या पुनर्बांधणीसाठी अनुदान देण्यात येणार असून मृत जनावरांच्या बदल्यात नवीन जनावरे देण्याची योजना राबवण्यात येत आहे. जनावरांसाठी चाऱ्याचीही व्यवस्था करण्यात येत आहे.
एकीकडे मदत दुसरीकडे कारवाईच्या सूचना
दरम्यान, उमरेड एमआयडीसीमधील ४० ते ५० कंपन्यांनी एकत्र येऊन सीएसआर फंडाच्या माध्यमातून मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेत बाधित नागरिकांना सर्वतोपरी मदत मिळावी, यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. या घटनेनंतर शेतात वणवा पेटवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायद्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पुण्यातील प्रकरणावर बावनकुळे म्हणाले…
दरम्यान, पुण्यातील अत्याचार प्रकरणावर बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होईल. एखाद्याने खून किंवा बलात्कार केला म्हणून त्याला रस्त्यावर फाशी देण्याचा कायदा आपल्या देशात नाही. आपल्याला एवढे पाहावे लागते की कोर्टासमोर आरोपी सुटू नये, यासाठी पक्के पुरावे असणे आवश्यक आहे. याकरिता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जे चार्जशीट दाखल केले, त्यात कोणतीही त्रुटी राहू नये याची काळजी घेतलेली आहे, असे बावनकुळे म्हणाले.
