एमएमआरडीएचा मेट्रो लाईन 6 प्रकल्पाचे काम वेगात सुरु आहे. विशेष म्हणजे एमएमआरडीएने शनिवार आणि रविवारच्या रात्री विशेष ब्लॉक घेऊन रेल्वे स्पॅनची उभारणी केली. या रेल्वे स्पॅनची नियोजित वेळेच्या निम्म्या वेळेत उभारणी पूर्ण झाली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई मेट्रो लाईन ६ मध्ये आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून, जोगेश्वरी येथे पश्चिम रेल्वे मार्गावर दुसरा स्टील कॉम्पोझिट गर्डर स्पॅन यशस्वीरीत्या उभारण्यात आला आहे. हा प्रकल्पातील अत्यंत तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक भाग मानला जातो. या कामाच्या पूर्णत्वामुळे मेट्रो लाईन ६ च्या एकूण कामाची प्रगती आता ८८ टक्क्यांहून अधिक झाली असून, प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने वेगाने पुढे जात असल्याचे स्पष्ट होत आहे. या नव्या स्पॅनची लांबी ३१.१६ मीटर असून वजन सुमारे ९० मेट्रिक टन आहे. या संरचनेत स्टील कॉम्पोझिट गर्डर्स, डायफ्राम्स आणि ब्रेसींग सिस्टीमचा समावेश असून, दीर्घकालीन मजबुती आणि सुरक्षितता लक्षात घेऊन त्याची रचना करण्यात आली आहे.
या महत्त्वाच्या रेल्वे स्पॅनचे काम पश्चिम रेल्वेकडून मंजूर ३ तास १० मिनिटांच्या ट्रॅफिक ब्लॉकमध्ये पूर्ण करायचे होते; मात्र एमएमआरडीएने ते केवळ १ तास ३५ मिनिटांत पूर्ण करत कार्यक्षम अंमलबजावणीचे उत्तम उदाहरण ठरले. यामुळे रेल्वे वाहतुकीवरील परिणाम कमीत कमी ठेवत, उच्चतम सुरक्षामानकांचे पालन करण्यात आले.
या संपूर्ण कामात ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) बंद करणे, वायर खाली घेणे, क्रेनची उभारणी, जड स्पॅन उचलणे, अचूक बसविणे, स्ट्रक्चरल फिक्सिंग, तपासणी आणि रेल्वे व्यवस्था पुन्हा सुरू करणे अशा अनेक गुंतागुंतीच्या टप्प्यांचा समावेश होता. हे सर्व काम अत्यंत मर्यादित वेळेत आणि अचूक समन्वयाने पूर्ण करण्यात आले.
या कामासाठी ५०० टन आणि ६०० टन क्षमतेच्या हायड्रॉलिक क्रेन्सचा एकत्रित वापर करण्यात आला, ज्यामुळे कार्यरत रेल्वे मार्गावर स्पॅन अचूकपणे उभारणे शक्य झाले. या संपूर्ण प्रक्रियेसाठी एमएमआरडीए, कंत्राटदार आणि पश्चिम रेल्वे यांच्यात मिनिटागणिक समन्वय साधावा लागला.
रेल्वे मार्गावर सलग दोन स्टील स्पॅन यशस्वीरीत्या उभारण्यात आल्यानंतर, मेट्रो लाईन ६ मधील सर्वात महत्त्वाच्या अभियांत्रिकी आव्हानांपैकी एक टप्पा पूर्ण करण्यात एमएमआरडीएला मोठे यश मिळाले आहे.
ही मार्गिका कार्यरत झाल्यानंतर स्वामी समर्थ नगर (अंधेरी लोखंडवाला) ते विक्रोळी दरम्यान धावणारी मेट्रो लाईन ६ मुंबईतील पूर्व-पश्चिम दळणवळण मोठ्या प्रमाणात सुधारेल, प्रवासाचा वेळ कमी करेल आणि नागरिकांना जलद, सुरक्षित व अधिक कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक पर्याय उपलब्ध करून देईल.
मेट्रो लाईन ६ संदर्भात एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मेट्रो लाईन ६ प्रकल्पाचा वेग आता लक्षणीय वाढला असून, ८८% टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे, अत्यंत गुंतागुंतीची अभियांत्रिकी कामे ज्या वेगाने आणि अचूकतेने पूर्ण केली जात आहेत, ते कौतुकास्पद आहे. ३ तासांपेक्षा अधिक कालावधीचा नियोजित ब्लॉक असताना अवघ्या १ तास ३५ मिनिटांत रेल्वे स्पॅन पूर्ण करणे हे आमच्या टीमच्या नियोजनक्षमतेचे, समन्वयाचे आणि तांत्रिक कौशल्याचे प्रतीक आहे. सर्वोच्च सुरक्षामानके, कार्यक्षमता आणि अभियांत्रिकी उत्कृष्टतेसह हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या जटिल कामाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल एमएमआरडीएतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेशासाठी जलद, एकात्मिक आणि भविष्योन्मुख वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी एमएमआरडीए कटिबद्ध आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा