Nashik Accident: दारुच्या नशेत कार चालविणाऱ्या चालकाने रस्त्यात दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर पळून जाण्यासाठी वेगाने रिव्हर्स घेतलेली कार थेट गॅरेजमध्ये घुसली.
शुक्रवारी रात्री नऊ वाजता विहितगावातील वडनेररोडवरील काका हांडोरे चौकात हा प्रकार घडला. अपघातात गॅरेजमध्ये बसलेली दिया विजय विश्वकर्मा ही तीनवर्षीय बालिका रिव्हर्स कारच्या धडकेत जखमी झाली. कारचालक तुषार सुभाष गाडेकर याच्याविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Nashik News: ’मी तुझ्यावर प्रेम करतो, तू मला आवडतेस,’ घरात शिरुन नाशकात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, रोडरोमियो गजाआड
नेमकं काय घडलं?
गाडेकर हा सफारी कारमधून (एमएच १५, सीक्यू ७१००) मित्रांना घेऊन भरधाव वेगाने जात असताना त्याने विहितगाव येथे एमएच १५, केआर ७६४६ या दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर पळून जात असताना तो वडनेर रोडवरील काका हांडोरे चौकात आला. गर्दी असल्याने त्याची कार थांबली. याचवेळी पाठीमागून काही नागरिक धावत आले. त्यापैकी एकाने गाडेकर याच्या कारची काच फोडली. यामुळे त्याने कार पुन्हा माघारी वळविण्याचा आणि वडनेर, पाथर्डी रस्त्याने पळून जाण्याचा विचार केला. यासाठी त्याने कार वेगाने रिव्हर्स घेतली. ती रस्त्याच्या कडेला असलेल्या गॅरेजमध्ये घुसली. यावेळी गॅरेजमध्ये बसलेल्या दिया विश्वकर्मा या बालिकेच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी चालकाला पकडले. तो नशेत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
Nashik News: नाशिक रिंगरोड भूसंपादनावेळी पोलिसांकडून घरात घुसून मारहाण; शेतकऱ्यांचा गंभीर आरोप
जखमी दियाला बिटको रुग्णालयात आणि नंतर मुंबई नाका येथे एका खासगी रुग्णालयात दाखल केले. नशेतील तरुणांनी वडनेर रोडवर एका विवाह समारंभाच्या ठिकाणी वाद्य वाजविणाऱ्यांशी वाद घातला आणि त्यांना मारहाण करून कारमधून पोबारा केला. यावेळी भरधाव कार नियंत्रणाबाहेर गेल्याने रस्त्यात दोन दुचाकींना उडवले.
