• Mon. Jun 15th, 2026
    Nashik News: नाशिक रिंगरोड भूसंपादनावेळी पोलिसांकडून घरात घुसून मारहाण; शेतकऱ्यांचा गंभीर आरोप

    Nashik News: प्रांत पवनदत्ता यांच्यासह पोलिसांनी घरात घुसून वयोवृद्धांना अमानुष मारहाण केली, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

    नाशिक रिंग रोड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा.प्रतिनिधी, नाशिक: बाह्य परिक्रमा रस्त्याच्या (रिंग रोड) भूसंपादनासाठी मोजणीदरम्यान अधिकारी व पोलिसांनी मातोरी व मुंगसरे येथील ग्रामस्थांना घरात घुसून मारहाण केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली असून, हे प्रकरण तापण्याची चिन्हे आहेत. जिल्हा प्रशासन व पोलिसांनी मात्र मारहाण झाली नसल्याचा दावा केला आहे.

    आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक शहर व लगतच्या ग्रामीण भागातून सुमारे ६६ किमीचा बाह्य परिक्रमा मार्ग विकसित केला जात आहे. त्यासाठी भूसंपादन केले जात असून, जमिनींची मोजणी सुरू आहे. मात्र, या विरोधात दरी, मातोरी, मुंगसरे, गोवर्धन, मखमलाबाद, गौळाणे, सारूळ, जलालपूर, महादेवपूर, ढकांबे, विंचूरगवळी आदी गावांतील शेतकरी न्यायालयात गेले आहेत.

    Maharashtra TimesNashik News: ​​’मी तुझ्यावर प्रेम करतो, तू मला आवडतेस,’ घरात शिरुन नाशकात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, रोडरोमियो गजाआड
    न्यायप्रविष्ट प्रकरण असूनही शुक्रवारी (दि. १) रात्री ग्रामस्थांना व्हॉट्सअॅपवर जमीन मोजणीच्या नोटिसा पाठवण्यात आल्या. शनिवारी (दि. २ मे) सकाळी ९.३० ही मोजणीची वेळ असताना, इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी जी. व्ही. एस. पवनदत्ता यांच्यासह तहसीलदार, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी व पोलिसांचा फौजफाटा सकाळी सातलाच मोजणीसाठी मुंगसरे गावात पोहोचला.

    कोणावरही लाठीमार केला नाही
    सिंहस्थासाठी रिंगरोड निर्मितीपूर्वी जमीन अधिग्रहणाच्या मोजणीवेळी मातोरी गावात शनिवारी (दि. २) शेतकऱ्यांना मारहाण आणि लाठीमार झाल्याचा आरोप करण्यात येत असताना ग्रामीण पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. कोणावरही लाठीमार केला नसून, महिलांना ताब्यात घेण्यासाठी महिला अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. पुरुषांनी कोणालाही हात लावलेला नाही. यासह काही शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा देत घरात शिरल्याने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यावेळीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यात मारहाण झालेली कुठेही दिसत नसल्याचा दावा ग्रामीण पोलिसांनी केला आहे.

    Maharashtra TimesNashik Crime: सत्तर कोटींची बनवेगिरी उघड; कार्यारंभ आदेशांवर कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्षांची बनावट सही, गुन्हा दाखल
    शेतकरी व महिलांना झालेली अमानुष मारहाण हा दहशतीचा प्रकार आहे. पवनदत्ता यांच्यावर गुन्हा दाखल करावा; अन्यथा छावा क्रांतिवीर सेना तीव्र आंदोलन उभे करेल. –करण गायकर, छावा क्रांतिवीर सेना

    मुंगसरे येथे शनिवारी सकाळी आठला जमीन मोजणी करण्यात आली. काही ग्रामस्थांनी विरोध केला. त्यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेण्यात आले. तेथील सात घरे वाचवण्यासाठी आराखडा बदलला आहे. मात्र, त्यामुळे इतरांची अधिक जागा जात असल्याने गावात दोन गट पडले आहेत. मारहाणीविषयी पोलिसांकडून माहिती घेऊन सांगतो. -आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा