• Sun. Jun 14th, 2026
    Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सेवा सुरु करण्यास एअर इंडियाची असमर्थता, नेमकं कारण काय?

    नवी मुंबई विमानतळ प्रवाशांसाठी सुरु झालं आहे. येत्या काळात लवकरच नवी मुंबई विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय उड्डाणदेखील होणार असल्याची माहिती आहे. असं असताना एक अनपेक्षित बातमी समोर आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, नवी मुंबई : देशातील हवाई वाहतूक क्षेत्रातील एका ऐतिहासिक पर्वाची सुरुवात २५ डिसेंबरला झाली असून, बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी सेवा अधिकृतरीत्या सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर २०२५ रोजी या विमानतळाचे उद्घाटन झाले होते. मोठ्या अपेक्षा आणि महत्त्वाकांक्षांसह उभारण्यात आलेल्या या विमानतळावरून दररोज सुमारे ५० हजार प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर एअर इंडिया विमान कंपनीने येथे सेवा सुरू करण्यास असमर्थता दर्शवल्याने या प्रकल्पासमोर अडथळे उभे राहिले आहेत.

    उच्च खर्च, अपुरी कनेक्टिव्हिटी आणि दुहेरी विमानतळ संचालनाचा वाढता आर्थिक बोजा ही यामागील प्रमुख कारणे असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. टाटा समूहाच्या एअर इंडियाने भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाकडे सध्याच्या परिस्थितीत नवी मुंबई विमानतळावरून सेवा सुरू करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याचे मत नोंदवले आहे. कंपनीने सध्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरूनच सेवा सुरू ठेवण्यास प्राधान्य दिले आहे.

    दुहेरी विमानतळ संचालन ही मोठी समस्या ठरत आहे. मुंबई आणि नवी मुंबई अशा दोन्ही विमानतळांवर एकाच वेळी सेवा चालवावी लागल्यास मनुष्यबळ, ग्राउंड हँडलिंग आणि तांत्रिक सुविधा यासाठीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. याशिवाय नवी मुंबई विमानतळावरील लँडिंग शुल्क इतर विमानतळांच्या तुलनेत जास्त असल्याने विमान कंपन्यांवर अतिरिक्त आर्थिक ताण पडत आहे.

    कनेक्टिव्हिटीचा अभाव ही आणखी एक गंभीर अडचण ठरत आहे. नवी मुंबई विमानतळापर्यंत अद्याप पुरेशी मेट्रो आणि रस्ते सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना तिथे पोहोचण्यासाठी दोन ते अडीच तासांचा वेळ लागत आहे. विशेषतः पश्चिम मुंबईतील प्रवाशांसाठी हा प्रवास अधिक किचकट ठरत आहे. विमान कंपन्यांचे बहुतांश कर्मचारीही पश्चिम उपनगरात राहत असल्याने त्यांनाही वेळेच्या बंधनात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

    माजी वैमानिक कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या मते, “सक्षम आणि जलद वाहतूक व्यवस्था निर्माण झाल्याशिवाय विमान कंपन्या नवी मुंबई विमानतळावर पूर्ण क्षमतेने सेवा सुरू करणार नाहीत.”

    दरम्यान, सध्या एअर इंडिया एक्स्प्रेस, इंडिगो, स्टार एअर आणि अकासा एअर या कंपन्यांकडून देशातील विविध शहरांसाठी सेवा सुरू असली, तरी एअर इंडियाच्या भूमिकेमुळे इतर विमान कंपन्यांचे स्थलांतरही संथ गतीने होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाच्या पूर्ण क्षमतेने वापरासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा