Mumbai Crime : पतीच्या मृत्यूचा दाखला हद्दीच्या वादावरून तब्बल पावणे दोन वर्षे मिळू शकला नसल्याने त्याच्या पत्नीला त्यासाठी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे!
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : देशातील सर्वाधिक लांबीच्या शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे १२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर सुसाट प्रवासाच्या सोयीबद्दल हा सेतू चांगलाच चर्चेत आला. मात्र काही महिन्यांनी एका व्यक्तीने या सेतूवरून उडी मारत आयुष्याची अखेर केल्याची घटना घडली. आता ती घटना पुन्हा चर्चेत आली आहे. संबंधित नागरिकाच्या मृत्यूचा दाखला हद्दीच्या वादावरून तब्बल पावणे दोन वर्षे मिळू शकला नसल्याने त्याच्या पत्नीला त्यासाठी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे!
तीन पालिका प्रशासनांचे हात वर
उरण नगरपालिका, नवी मुंबई महापालिका व पनवेल महापालिकेनेही संबंधित मृत्यू हा आपल्या हद्दीत झाला नसल्याचे म्हणत मृत्यूचा दाखला देण्याविषयी हात वर केल्याने सुनयना करुतुरी यांनी ॲड. जमिल खान यांच्यामार्फत रिट याचिका केली आहे. याविषयी न्या. रवींद्र घुगे व न्या. हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठासमोर या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
अटल सेतुवरुन पाण्यात उडी
सुनयना यांच्या याचिकेनुसार, त्यांचे पती श्रीनिवास करुतुरी हे २३ जुलै २०२४ रोजी डोंबिवलीतील आपल्या निवासस्थानाहून गाडीने निघाले होते. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांची गाडी देशातील सर्वाधिक लांबीच्या (२१.८ कि.मी.) अटल सेतूवर बेवारस अवस्थेत आढळली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, श्रीनिवास यांनी पुलावरून खाली पाण्यात उडी मारल्याचे दिसले.
प्रशासनाचं म्हणणं काय होतं?
या घटनेनंतर सुनयना यांनी श्रीनिवास यांच्या मृत्यूचा दाखला मिळण्यासाठी प्रथम उरण नगरपालिकेत अर्ज दिला. मात्र, ‘ज्याठिकाणी घटना घडली तो भाग आमच्या हद्दीत येत नाही,’ असे कारण देत त्या नगरपालिकेने नकार दिला. त्यानंतर नवी मुंबई महापालिका व पनवेल महापालिकेकडूनही त्यांना तसेच उत्तर मिळाले. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना ही याचिका करावी लागली आहे.
याचिकेत म्हणणे काय?
‘पतीच्या मृत्यूचा दाखला मिळत नसल्याने मला नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तो दाखला मिळाला नसल्याने मला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मला सध्या माझी वृद्ध आई व नातेवाईक यांच्यावर अवलंबून राहावे लागत आहे. संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची निष्क्रियता व दुर्लक्ष यामुळे सन्मानाने जगण्याचा माझा हक्क हिरावला जात आहे. हद्दीचे कारण देत शासकीय प्रशासनांनी घेतलेली ही भूमिका अन्यायकारक व मनमानी स्वरूपाची आहे. त्यामुळे प्रशासनांना योग्य ते निर्देश द्यावेत,’ असे म्हणणे सुनयना यांनी याचिकेत मांडले आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा