• Sat. Jun 6th, 2026
    Bageshwar Baba: धीरेंद्र शास्त्रीविरोधात रोष; छत्रपती शिवरायांबद्दलच्या वादग्रस्त विधानावर राज्यभरात संतापाची लाट

    Bageshwar Baba: इतिहासाची मोडतोड करून चुकीची माहिती पसरवणे हे राज्याच्या अस्मितेचा अपमान असल्याचे मत सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे.

    धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर रोष(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. महाराजांच्या पराक्रमाबद्दल आणि त्यांच्या संघर्षांबद्दल शास्त्रींनी केलेल्या दाव्यांमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून, नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

    जामठा येथील भारतदुर्गा मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले, ‘ छत्रपती शिवाजी महाराज सततच्या युद्धांनी आणि संघर्षांनी थकले होते. ते एकदा समर्थ रामदास स्वामींकडे गेले, आपला मुकुट त्यांच्या चरणी ठेवला आणि म्हणाले की, आता माझ्यात लढण्याची ताकद उरलेली नाही, हे राज्य तुम्हीच सांभाळा. जेव्हा महाराजांनी राज्य सोडण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा समथर्थांनी त्यांना विचारले की, ‘शिष्याचे कर्तव्य काय’. त्यावर महाराजांनी आज्ञा पाळणे असे उत्तर दिले. त्यानंतर समर्थांनी तो मुकुट पुन्हा महाराजांच्या मस्तकावर ठेवला आणि सांगितले की, ‘राज्य माझे असेल, पण ते चालवण्याची जबाबदारी तुझी असेल.’ त्यांच्या या वक्तव्यावर आता टीकेची झोड उठत आहे.

    Maharashtra TimesNagpur News: रात्रीच्यावेळी घरात शिरला अजगर, कुलरच्या थंड हवेत पलंगाखाली विसावला; थोडक्यात बचावला कुटुंबीयांचा जीव
    या दाव्यामुळे इतिहासाचा चुकीचा संदर्भ दिला गेल्याची भावना निर्माण झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ‘इतिहासात अशा प्रकारचा कुठलाच दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही. महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात. रामायण आणि महाभारताबाबतही अनेक लोककथा आहेत. इतिहासावर किंवा परिस्थितीवर अवलंबून त्या लोककथा तयार होत असतात. जो इतिहास आपण शिकलो आहे किंवा आपल्या इथे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत, त्यात अशा प्रकारचा कुठलाही दाखला नाही.’ नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज श्रीमंत डॉ. मुधोजी राजे भोसले म्हणाले, ‘स्वतःला धर्माचे रक्षक म्हणवणारेच जर महाराजांबद्दल चुकीचे विधान करत असतील, तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. महाराजांनी आयुष्यभर देव, देश आणि धर्मासाठी संघर्ष केला आहे, हे सत्य नाकारता येणार नाही.’

    Maharashtra TimesBageshwar Baba : ‘मुलं चार जन्माला घाला, पण एक RSS ला द्या’, बागेश्वर बाबांचं वक्तव्य
    ‘संजय गायकवाड कुठे आहेत?’
    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर आक्रमक भूमिका धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना अटक करण्याची मागणी केली. ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही, निजामशाही आणि मोगलांसारख्या बलाढ्य सत्तांना नमवून स्वराज्य उभे केले. हा जाज्वल्य इतिहास संपूर्ण जगाला ठाऊक असताना, एका सार्वजनिक मंचावरून महाराजांच्या पराक्रमाचा अवमान होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.’ ‘स्वतःला छत्रपतींचे वंशज म्हणवणारे ते संजय गायकवाड कुठे आहेत? धीरेंद्र शास्त्रीला ढगात कधी पोहोचणार आहेत ? या भोंदूला शिव्या द्या दणकून महाराष्ट्र तुमचा सत्कार करेल. आहे का हिंमत, असे म्हणत वडेट्टीवारांनी आमदार संजय गायकवाड यांनादेखील आव्हान दिले आहे.

    Maharashtra TimesNagpur News: लग्नाची लगबग सुरु असतानाच तरुण अभियंत्याचा मृत्यू; रात्री झोपला तो सकाळी उठलाच नाही, कुटुंबावर दु:खाचा डोंगर
    ‘फडणवीस, गडकरी, भागवतांनी माफी मागावी’
    धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले विधान अत्यंत आपत्तीजनक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हे विधान करण्यात आले, तरीही या तिन्ही नेत्यांनी याचा साधा विरोधही केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे ही आता भाजप-आरएसएसचे राष्ट्रीय धोरण बनले असून, महाराजांचे विचार आणि कर्तृत्व त्यांना मान्य नाही. महाराष्ट्र हा अपमान कधीही सहन करणार नाही. त्यामुळे धीरेंद्र कृष्ण शास्त्री, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि मोहन भागवत यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा