• Wed. Jun 17th, 2026

    Devendra Fadnavis: फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे महादेव बालगुडे अटकेत, नेमका आरोप काय?

    Devendra Fadnavis: फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे महादेव बालगुडे अटकेत, नेमका आरोप काय?

    NCP News: प्राथमिक तपासानंतर पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी महादेव बालगुडे यांना बारामतीमधून अटक केली.

    आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टप्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे महादेव बालगुडे अटकेत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड: सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी पिंपरी- चिंचवड सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे सोशल मीडिया विभागाचे राज्य प्रमुख महादेव बालगुडे यांना अटक केली आहे. या संदर्भात एका वकिलाने पिंपरी- चिंचवड सायबर पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या कारवाईने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महादेव बालगुडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो मॉर्फ करून तो आक्षेपार्ह स्वरूपात सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा गंभीर आरोप आहे. संबंधित पोस्टमुळे सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता असल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.

    याशिवाय, तपासादरम्यान असेही समोर आले आहे की, बालगुडे यांनी नक्षलवादी नेता हिडमा याचे उदात्तीकरण करणारी सामग्री देखील आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केली होती. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

    ॲड. बसवराज मल्लिकार्जुन यादवाड (रा. पुणे) यांनी याप्रकरणी २२ एप्रिल रोजी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. प्राथमिक तपासानंतर पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी महादेव बालगुडे यांना बारामतीमधून अटक केली.

    दरम्यान, सायबर पोलिसांनी संशयित बालगुडे याला शुक्रवारी (२४ एप्रिल) अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पुढील तपास पिंपरी- चिंचवड सायबर पोलीस करत आहेत. या घटनेमुळे सोशल मीडियावरील जबाबदारी आणि कायदेशीर बंधनांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा