Bhandara ST Bus Accident : बस रिव्हर्स घेत असताना पाण्याच्या कॅन आणण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा बसखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. रोहित खेडकर आणि ३ वर्षीय रौनक खेडकर अशी मृतांची नावे असून, या घटनेमुळे भंडारा शहरात संतापाची लाट उसळली आहे.
पाण्याच्या कॅन आणण्यासाठी गेले अन काळ आला…
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक रोहित खेडकर हे भंडारा शहरातील चांदणी चौक, कुंभार टोली येथील रहिवासी असून त्यांचा ‘आरो प्लांट’चा व्यवसाय होता. ते शहरासह एसटी डेपोतही पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करत असत. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी रोहित रिकामी झालेली पाण्याची कॅन आणण्यासाठी डेपोत गेले होते. यावेळी त्यांनी कधी नव्हे ते आपला ३ वर्षांचा मुलगा रौनक यालाही सोबत नेले होते.
चालकाचा अंदाज चुकला आणि अनर्थ घडला
बस दुरुस्तीच्या शेडमध्ये उभी असलेली एसटी बस (क्रमांक: एमएच ४०, वाय ५८७६) रिव्हर्स घेत असताना रोहित आपल्या दुचाकीसह त्या बसच्या मागे उभे होते. मात्र, बस चालकाला याचा अंदाज न आल्याने त्याने अचानक बस मागे घेतली. बसने दुचाकीला धडक देऊन काही अंतर फरफटत नेले. हा प्रकार लक्षात येताच अन्य कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली, परंतु तोपर्यंत काळाने झडप घातली होती. या भीषण अपघातात बाप-लेकाचा जागीच प्राण गेला.
Marathi Compulsion : रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी येणं गरजेचं, अन्यथा परवाने रद्द? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले…
डेपो परिसरात तणाव आणि नागरिकांचा संताप
घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच शहरातील शेकडो नागरिक एसटी डेपो परिसरात जमा झाले. या अपघाताला एसटी विभागाचे कर्मचारी आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला. दरम्यान, खासदार प्रशांत पडोळे यांनी सहकाऱ्यांसह डेपोत धाव घेत मृतकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याची मागणी करत आंदोलन सुरू केले.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त आणि लेखी आश्वासन
घटनेमुळे निर्माण झालेली तणावाची परिस्थिती पाहता साकोली, कारधा, भंडारा, जवाहरनगर, जिल्हा वाहतूक शाखा आणि स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथक घटनास्थळी दाखल झाले होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अखेर पहाटे ४ वाजेच्या सुमारास प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी माधुरी तीखे, MSRTC चे विभागीय नियंत्रक श्रीकांत गभने, अप्पर पोलीस अधीक्षक मोरे, शहर पोलीस निरीक्षक भुसारी, ग्रामीण पोलीस निरीक्षक सूर्यवंशी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष बोरकर उपस्थित होते.
