Nagpur Engineer Died In Delhi: घरी लग्नाची लगबग सुरु असतानाच तरुण अभियंत्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हा तरुण दिल्लीत नोकरीनिमित्ताने स्थायिक झाला होता.
काय घडलं?
एलआयटीमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर रोहित नोकरीनिमित्त दिल्लीत स्थायिक झाला होता. आपल्या मेहनतीच्या कमाईतून त्याने वाठोडा येथील ई-नारायणा स्कूलजवळ स्वतःचा फ्लॅटही घेतला होता. दोन आठवड्यांपूर्वीच त्याचा विवाह निश्चित होऊन साक्षगंधाचा कार्यक्रम पार पडला होता. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून रोहित झोपला. गुरुवारी सकाळी तो उठलाच नाही. नागपूरहून आईने वारंवार फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी काळजीतून दिल्लीतील त्याच्या मित्रांना संपर्क केला. मित्र त्याच्या घरी पोहोचले तेव्हा रोहित बेशुद्धावस्थेत होता. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
झोपेतच हृदयविकाराचा झटका
झोपेतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याची प्राणज्योत मालवली. रोहितचे पार्थिव नागपुरात आणल्यानंतर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्यापश्चात आई अर्चना, वडील धनंजय (राजू) दलाल, लहान भाऊ समित आणि मोठा आप्तपरिवार आहे .
Nagpur News : अंगणात दुडू-दुडू पावलं टाकणारी चिमुकली संध्या क्षणात दिसेनाशी झाली; बादलीतील पाण्यात…, नागपूरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना
तर दुसऱ्या एका घटनेत, महाबळेश्वर-पोलादपूर दरम्यानच्या अंबेनळी घाटात गुरुवारी सायंकाळी दुचाकीच्या अपघातात पती-पत्नीचा दरीत कोसळून मृत्यू झाला. मोहन चव्हाण आणि राजश्री चव्हाण (रा. वाई) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. प्रतापगड कमानीनजीक ही दुर्घटना घडली. महाबळेश्वर ट्रेकर्स व प्रतापगड रेस्क्यू टीमने दरीत उतरून मृतदेह शोधले. मृत दाम्पत्य भंगार व्यावसायिक असल्याची माहिती समोर येत आहे. हे दाम्पत्य पोलादपूरहून वाईकडे परत येत होते. त्यांच्या दुचाकीवर भंगार वस्तूंची गाठोडी होती. नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकी रस्त्याच्या कडेला जाऊन रेलिंगला धडकली. दुचाकी तिथेच अडकून चव्हाण दाम्पत्य ३०० फूट खोल दरीत कोसळले. बचाव पथकाने खोल दरीत उतरून मदतकार्य सुरू केले.
