• Sun. Jun 7th, 2026

    वैदिक मिलेट्स: पारंपरिक धान्याला आधुनिक आरोग्याची जोड देणारी शुभांगी सोनवळे यांची प्रेरणादायी यशोगाथा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 24, 2026
    वैदिक मिलेट्स: पारंपरिक धान्याला आधुनिक आरोग्याची जोड देणारी शुभांगी सोनवळे यांची प्रेरणादायी यशोगाथा – महासंवाद

    आजच्या धावपळीच्या युगात ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ हे ब्रीदवाक्य आपण विसरत चाललो आहोत. मात्र, याच काळात आपल्या पूर्वजांनी दिलेल्या सकस आहाराचे महत्त्व ओळखून शुभांगी अंकुश सोनवळे यांनी  पारंपरिक शेती उत्पादनांना आधुनिक रूप देत यशस्वी मिलेट उद्योग उभारला. त्यांच्या उत्पादनाला बाजार पेठेत मोठी मागणी आहे.
    भारत हा प्राचीन काळापासून नाचणी, ज्वारी, बाजरी यांसारख्या तृणधान्यांचा (मिलेट्स) देश म्हणून ओळखला जातो. ही धान्ये पौष्टिक आणि पर्यावरणपूरक असूनही मधल्या काळात ती आपल्या ताटातून हरवली होती. शुभांगी सोनवळे यांनी हीच गरज ओळखून बाजरी खा, उत्तम जगा  हा मूलमंत्र स्वीकारला. केवळ व्यवसाय म्हणून नव्हे, तर समाजाला सुदृढ बनवण्याच्या ध्येयातून ‘वैदिक मिलेट्स’चा जन्म झाला.


    बाजारू खाद्य पदार्थांमध्ये मैदा आणि साखरेचा अतिवापर होत असताना, वैदिक मिलेट्सने त्याला एक सशक्त पर्याय दिला आहे. सेंद्रिय गूळ आणि शुद्ध तुपाचा वापर. उत्पादने पूर्णपणे ग्लूटेन-फ्री, साखरमुक्त आणि मैदाविरहित आहेत. त्यामुळे नाचणी कुकीज, मिलेट लाडू, शेवई, चिवडा यांसारखे चविष्ट पदार्थ जे लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या पसंतीस उतरले आहेत.
    कोणताही छोटा उद्योग मोठा होण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. शुभांगी यांच्या जिद्दीला ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग’ (PMFME) योजनेची साथ मिळाली. या योजनेद्वारे मिळालेली आर्थिक मदत, तांत्रिक प्रशिक्षण आणि ब्रँडिंगच्या मार्गदर्शनामुळे ‘वैदिक मिलेट्स’ने स्थानिक मर्यादा ओलांडून मोठ्या बाजारपेठेत झेप घेतली.
    वैदिक मिलेट्स’ हे केवळ एक उत्पादन केंद्र राहिले नसून ते महिला सक्षमीकरणाचे एक केंद्र बनले आहे. या उद्योगामुळे अनेक स्थानिक महिलांना सन्मानाचा रोजगार मिळाला. शेतकऱ्यांच्या तृणधान्याला योग्य भाव आणि बाजारपेठ उपलब्ध झाली.
    जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर कोणतीही महिला शून्यातून विश्व निर्माण करू शकते, हे ‘वैदिक मिलेट्स’ने सिद्ध केले आहे. आज ‘वैदिक मिलेट्स’चा सुगंध घराघरात पोहोचला आहे. ही केवळ एका व्यवसायाची यशोगाथा नसून, ती आपल्या पारंपरिक आहाराचा सन्मान करण्याची आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची गोष्ट आहे. आपण सर्वांनी अशा उद्योजकांना प्रोत्साहन देऊन आपल्या आहारात मिलेट्सचा समावेश करणे हीच या यशाला दिलेली खरी दाद ठरेल.

    वर्षा पाटोळे
    जिल्हा माहती अधिकारी, सातारा

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed