• Sat. Jun 6th, 2026

    Mumbai Crime: गोळ्या घेतल्या, कॉन्सर्टमध्ये नाचली अन् आता कांड उघड; मुंबईतील अमली पदार्थ प्रकरणात अभिनेत्रीला अटक

    Mumbai Crime: गोळ्या घेतल्या, कॉन्सर्टमध्ये नाचली अन् आता कांड उघड; मुंबईतील अमली पदार्थ प्रकरणात अभिनेत्रीला अटक

    Goregaon Music Concert Case: महेश खेमलानी उर्फ मार्क या व्यक्तीच्या सूचनेवरून आरोपींनी जियाच्या खात्यावर रक्कम वळती केली असून मार्क कोण आहे, याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

    मुंबईतील अमली पदार्थ प्रकरणाला धक्कादायक वळण; अभिनय क्षेत्रातील तरुणीचा सहभाग आढळला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: नेस्को ड्रग्ज मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून दररोज धक्कादायक खुलासे केले जात आहेत. ड्रग्ज पुरवठादारांच्या साखळीमध्ये आयुष साहित्य या तरुणाची प्रमुख भूमिका असल्याचे तपासातून समोर आले आहे. मुंबईहून गोव्याला ड्रग्ज गोळ्यांचा साठा घेऊन जात असताना पोलादपूरनजीक पोलिसांची नाकाबंदी दिसताच त्याने तेथेच ड्रग्जच्या गोळ्या फेकल्या. पोलिसांनी पोलादपूर गाठत सुमारे १५ लाख रुपयांच्या एक्स्टसीच्या ९३३ गोळ्यांचा साठा जप्त केला. तसंच या प्रकरणात आता अभिनय क्षेत्रातील तरुणीचंही नाव समोर आलं आहे.

    गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये ११ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये ड्रग्जचा ओव्हरडोस झाल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सदोष मनुष्यवध, अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून ११ आरोपींना अटक केली आहे. कॉन्सर्टमध्ये एकस्टसी गोळ्या विकणाऱ्या आनंद पटेल, विनीत गेरेलानी, शुभ अग्रवाल आणि मुख्य आरोपी आयुष साहित्य या आरोपींनी मिरा-भाईंदर येथील लोढा कासा मॅक्सिमा सोसायटीत राहणाऱ्या जिया रिचेल जेकब हिच्या खात्यावर ४.३७ लाख रुपये वळते केल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. जिया अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी धडपडत असून ती स्वतः ११ एप्रिल रोजी नेस्को सेंटरमधील कॉन्सर्टमध्ये सहभागी होती. तिनेही एकस्टसीच्या गोळ्यांचे सेवन केले होते.

    म्युझिक कॉन्सर्टमध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे समजताच उल्हासनगरमध्ये राहणारा आयुष अटक टाळण्यासाठी एकस्टसीचा साठा घेऊन गोव्याला पसार होण्याच्या बेतात होता. पोलादपूरपर्यंत पोहोचल्यानंतर रायगड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी असल्याचे त्याने पाहिले. पकडले जाऊ नये, यासाठी त्याने हा साठा पोलादपूर येथे फेकला. चौकशीत ही माहिती पुढे येताच वनराई पोलिस आयुषला घेऊन पोलादपूरला पोहोचले आणि तेथून त्यांनी ९३३ गोळ्या हस्तगत केल्या.

    जियाची पोलिस कोठडीत रवानगी

    ड्रग्ज खरेदी-विक्रीचे पैसे सर्वांत शेवटी जिया हिच्या खात्यावर गेल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तिला मिरा रोड येथून बुधवारी अटक केली. गुरुवारी तिला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिची २७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. अटक सुरक्षारक्षक प्रदीप गुप्ता हादेखील पोलिस कोठडीत असून त्याची मुदत आज, शुक्रवारी संपणार आहे, तर इतर आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा