• Thu. Sep 10th, 2026

अमृत संस्थेतर्फे ११ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘विश्वबंधुत्व पंधरवडा’ – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 10, 2026

  • राज्यातील संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन

 मुंबई, दि. १० : सामाजिक ऐक्य, परस्पर सन्मान, सहिष्णुता, मानवता आणि बंधुभावाची मूल्ये समाजजीवनात अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने ११ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘विश्वबंधुत्व पंधरवडा’ आयोजित करण्यात येणार आहे. या पंधरवड्यात विविध सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेने केले आहे.

विविधता आणि मतभिन्नतेचा सन्मान राखत समाजात एकोपा, परस्पर सहकार्य आणि बंधुभावाची भावना वृद्धिंगत व्हावी, तसेच ही मूल्ये केवळ विचारांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरावीत, या उद्देशाने या पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शिकागो भाषण कृती कार्यक्रमप्रमुख आकर्षण

पंधरवड्यादरम्यान ‘शिकागो भाषण कृती कार्यक्रम’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून सामाजिक ऐक्य, मानवता, सहिष्णुता, परस्पर सन्मान आणि बंधुतेची मूल्ये समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, सामाजिक व स्वयंसेवी संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी आस्थापनांनी आपल्या स्तरावर चर्चासत्रे, व्याख्याने, स्पर्धा, जनजागृतीपर आणि मूल्याधिष्ठित उपक्रम आयोजित करून या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेने केले आहे.

विद्यार्थी, युवकांच्या सहभागाला प्रोत्साहन

या अभियानातून विद्यार्थी आणि युवकांमध्ये सामाजिक जबाबदारी, परस्पर सन्मान, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्यावर भर देण्यात येणार आहे.

ऑनलाइन नोंदणीची सुविधा

अभियानात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांनी vbd.mahaamrut.org.in या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी. नोंदणीनंतर संस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रानुसार ‘शिकागो भाषण कृती कार्यक्रम’ अंतर्गत उपक्रम आयोजित करावेत.

‘विविधतेतून एकता, एकतेतून बंधुता आणि बंधुतेतून सशक्त समाज व समर्थ राष्ट्र’ या विचाराने प्रेरित होऊन राज्यातील संस्था, विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन अमृत संस्थेने केले आहे.

0000

धोंडिराम अर्जुन/विसंअ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed