मुंबई, दि. १० : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राची समृद्ध लोककला, लोकपरंपरा, शास्त्रीय कला आणि सांस्कृतिक वैभव राज्याच्या सीमांपलीकडे पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन जम्मू, अमरावती(आंध्र प्रदेश) आणि रायपूर(छत्तीसगड) येथे करण्यात आले आहे.
जम्मू येथे शुक्रवार, 18 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 12.30 वाजता पद्मश्री पद्मा सचदेव गव्हर्नमेंट कॉलेज ऑडिटोरियम, गांधीनगर, जम्मू-काश्मीर येथे कार्यक्रम होणार आहे. यामध्ये लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य आणि गायनाच्या माध्यमातून महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, भक्तिभाव आणि गणेशोत्सवाचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप सादर केले जाणार आहे. आंध्र प्रदेशातील अमरावती येथे मंगळवार, 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे कार्यक्रम होणार आहे. नमन, गण, जाखडी नृत्य, धनगरी नृत्य, कोळी नृत्य तसेच जागरण-गोंधळ आदी लोककलांचे सादरीकरण या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असेल. या कलाप्रकारांतून महाराष्ट्राच्या लोकजीवनातील भक्ती, श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन घडणार आहे.
छत्तीसगडमधील रायपूर येथे बुधवार, 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्र मंडळ, जी.ई. रोड, चौबे कॉलनी येथे ‘लोककलेतील श्रीगणेश’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट्स यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम सादर केला जाणार असून, महाराष्ट्र मंडळ, रायपूर यांच्या सौजन्याने त्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या लोककला, लोकपरंपरा, शास्त्रीय कला आणि संगीत परंपरेला राज्याबाहेर व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच देशाच्या विविध भागांतील रसिकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची अनुभूती करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. गणेशभक्ती, लोकजीवन आणि विविध कलाविष्कारांचा संगम असलेला हा उपक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विविध लोककला, लोकपरंपरा, शास्त्रीय कला आणि सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
जम्मू, अमरावती आणि रायपूर येथील या सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य आहे. संबंधित शहरांतील व परिसरातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.
००००
श्री. संजय ओरके/विसंअ