• Wed. Jun 17th, 2026
    Sharad Pawar : रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार यांचा पहिला व्हिडीओ समोर, Viral Video मध्ये नेमकं काय?

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना रुग्णालयातून आज डिस्चार्च मिळाला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते त्यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी रवाना झाले आहेत. या दरम्यान डिस्चार्जनंतरचा त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. डॉक्टरांच्या टीमकडून शरद पवार यांच्या प्रकृतीची काळजी घेतली जात होती. त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्च मिळाला आहे. शरद पवार यांना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला आहे. रुग्णालयातून डिस्चार्च मिळाल्यानंतर शरद पवार मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी गेले आहेत. रुग्णालयातून डिस्चार्च मिळाल्यानंतर त्यांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत ते खुर्चीवर बसून टीव्हीवरील बातम्या पाहत असल्याचं बघायला मिळत आहे. संबंधित व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    संबंधित व्हिडीओत शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार हे खुर्चीवर बसून टीव्ही पाहत आहेत. टीव्हीवर एका वृत्तवाहिनीवर पवार कुटुंबाशी संबंधित बातमी सुरु आहे. तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे या शरद पवार यांचा व्हिडीओ काढत असल्याचं स्पष्ट होत आहे. शरद पवार यांच्या पाठिमागे असणाऱ्या काचेत सुप्रिया सुळे यांची प्रतिमा दिसत आहे. ते मोबाईलवर शरद पवार यांचा व्हिडीओ काढत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार यांची प्रकृती बरी असल्याचा मेसेज त्यांना यातून द्यायचा असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पण हा एक व्हायरल व्हिडीओ असून या व्हिडीओची आम्ही पुष्टी करत नाही.

    शरद पवार पाहत असणारी बातमी कुठली?

    दरम्यान, संबंधित व्हिडीओत शरद पवार हे टीव्हीवर पवार विरुद्ध पवार लढतीची बातमी पाहत असल्याचं बघायला मिळत आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं आहे. आमदार रोहित पवार यांना पत्रकारांनी 2029 मध्ये बारामतीत पवार विरुद्ध पवार निवडणूक होईल का? असा प्रश्न विचारला असता शक्यता नाकारता येत नाही, असं म्हटलं. त्यावर शरद पवारांच्या पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली. आता याबाबत भाष्य करणं योग्य नाही, असं युगेंद्र पवार म्हणाले आहेत.

    “लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो. पण आता चर्चा करणे ही योग्य वेळ नाहीय. आपण सर्वांनी सुनेत्रा वहिणींना पाठिंबा दिलेला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे पक्ष ठामपणे सुनेत्रा वहिणींच्या पाठिशी आहेत”, अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवार यांनी दिली आहे.

    दरम्यान, जय पवार यांनीदेखील युगेंद्र पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. कुटुंब म्हणून सर्वांनी एकत्र राहावं, अशी पवार कुटुंबातील सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे पवार विरुद्ध पवार लढत होणार नाही, असं जय पवार यांनी म्हटलं आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा