• Tue. Aug 4th, 2026

    महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘शक्ती ऑन व्हील्स’ उपक्रम महत्त्वपूर्ण – मंत्री आदिती तटकरे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 4, 2026
    महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘शक्ती ऑन व्हील्स’ उपक्रम महत्त्वपूर्ण – मंत्री आदिती तटकरे – महासंवाद

    मुंबई, दि. ४: शहरातील महिला बचत गटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ आणि दैनंदिन वापराच्या वस्तू शासकीय कार्यालये व वसतीगृहांमध्ये सहज उपलब्ध झाल्यास नोकरदार महिलांना मोठा दिलासा मिळेल, असे सांगून राज्यात अशा स्वरूपाचे ‘शक्ती ऑन व्हील्स’ उपक्रम अधिक व्यापक प्रमाणात राबविण्यात यावेत, अशी अपेक्षा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली.

    सचिवालय जिमखाना येथे ‘शक्ती ऑन व्हील्स’ या प्रदर्शनी व विक्री व्हॅनचे उद्घाटन मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. अनिर्वेदशक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. फाउंडेशनच्या संस्थापक आर. विमला यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झाला आहे.

    यावेळी मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, जिल्ह्यातील विविध बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी आणि त्यांची थेट ग्राहकांपर्यंत पोहोच वाढावी, या उद्देशाने हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. विविध शासकीय कार्यालये तसेच मेट्रो स्थानक परिसरात अशा विक्री व्हॅन कार्यरत झाल्यास महिला उद्योजकांच्या व्यवसायाला चालना मिळेल. रेडी-टू-ईट पदार्थ, मिलेट उत्पादने, घरगुती वस्तू आणि दैनंदिन वापरातील साहित्य नोकरदार महिलांना त्यांच्या कार्यस्थळी सहज उपलब्ध झाल्यास त्यांचा वेळ वाचेल आणि दैनंदिन जीवन अधिक सुलभ होईल.

    फाउंडेशनच्या संस्थापक व निवृत्त सनदी अधिकारी आर. विमला यांनी सांगितले की, महिला सक्षमीकरणासाठी अनेक संस्था काम करीत असतात. महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही समस्या असल्याचे निदर्शनात आले. यावर उपाय म्हणून ग्राहकांना त्यांच्या सोयीप्रमाणे उत्पादने उपलब्ध करून दिल्यास त्याची मागणी वाढू शकते, यामुळे महिला बचत गटांच्या महिलांचा उद्योग वाढण्यासही मदत होईल.

    ‘शक्ती ऑन व्हील्स’वर पापड, लोणची, तूप, विविध प्रकारची पिठे, रेडी-टू-ईट पदार्थ आदी दैनंदिन वापरातील सर्व उत्पादने सेंद्रिय पद्धतीने तयार करण्यात आली असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या रासायनिक घटकांचा वापर केलेला नाही. स्वयंसहायता बचत गटांनी तयार केलेली ही दर्जेदार उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही या उपक्रमातून मोठी चालना मिळणार आहे.

    मुंबई शहरातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून, पुढील काळात राज्यभर तसेच देशभरात किमान १०० विक्री वाहने सुरू करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. फिरत्या विक्री व्हॅनमुळे ग्राहकांना आवश्यक वस्तू त्यांच्या परिसरात उपलब्ध होतील. त्यामुळे उत्पादक महिला, विक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहक अशा तिन्ही घटकांना या उपक्रमाचा लाभ होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

    ००००

    श्रद्धा मेश्राम/विसंअ

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed