• Tue. Aug 4th, 2026

    विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांच्याकडून केंद्रीय मंत्र्यांच्या सदिच्छा भेटी – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 4, 2026
    विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांच्याकडून केंद्रीय मंत्र्यांच्या सदिच्छा भेटी – महासंवाद

    नवी दिल्ली, दि. ४ : मुंबईतील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जमिनींवरील रखडलेले पुनर्विकास प्रकल्प, मुंबई पोर्ट ट्रस्ट, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वेच्या मालकीच्या जमिनींसंदर्भातील प्रलंबित प्रश्न, सॉल्ट पॅन जमिनींचा विकास तसेच मुंबईच्या पायाभूत सुविधांशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज नवी दिल्लीत विविध केंद्रीय मंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा केली.

    विधानपरिषदेचे उपसभापती म्हणून निवड झाल्यानंतर श्री अहिर प्रथमच दिल्ली दौऱ्यावर आले होते. आज त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह, केंद्रीय बंदर, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री  सर्बानंद सोनोवाल तसेच केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची सदिच्छा भेट घेऊन महाराष्ट्राशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली.

    या संदर्भात माध्यम प्रतिनिधींना माहिती देताना सचिन अहिर म्हणाले की, विधानपरिषदेचे उपसभापती म्हणून निवड झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षांची सदिच्छा भेट घेणे हा संसदीय परंपरा आणि शिष्टाचाराचा भाग आहे. त्यानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील खासदारांच्या शिष्टमंडळाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची सदिच्छा भेट घेतली.

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुंबईतील केंद्र सरकारच्या मालकीच्या जमिनींवरील पुनर्विकासासाठी एकसमान धोरणाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जमिनींसाठी वेगवेगळे नियम व निकष लागू असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आणून देत, एकाच शहरात पुनर्विकासासाठी वेगवेगळ्या धोरणांचा अवलंब होऊ नये, अशी भूमिका शिष्टमंडळाने मांडली.

    मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीतील कुलाबा, बॅलार्ड पिअर आणि परिसरातील हजारो झोपड्या तसेच मोडकळीस आलेल्या सेस इमारतींचा पुनर्विकास ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळत नसल्यामुळे अनेक वर्षांपासून रखडला आहे. या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही अहीर यांनी सांगितले.

    केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावरील रेल्वेसेवा आणि इतर प्रवासी सुविधांबाबत सकारात्मक चर्चा झाली. तसेच मुंबई उपनगरीय रेल्वेच्या विकासासाठी महालक्ष्मी, प्रभादेवी आणि परिसरातील रेल्वे स्थानकांच्या उन्नतीकरणासंदर्भात लवकरच महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांच्याशी झालेल्या सुमारे २५ मिनिटांच्या बैठकीत देशातील व राज्यातील सूतगिरण्यांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. कोविड-१९ कालावधीपासून अनेक सूतगिरण्या बंद असून, त्यामुळे उत्पादन ठप्प झाले आहे. व कामगारांना देखील वेतन प्राप्त होत नाही सदर वेतनाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी चर्चा करण्यात आली.एन टी सी च्या जागेवर असणाऱ्या जमिनीतील असणाऱ्या चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत देखील चर्चा करण्यात आली.तसेच एन टी सी च्या ताब्यातील बंद पडलेल्या गिरणीच्या जमिनी या गिरणी कामगारांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने म्हाडाच्या ताब्यामध्ये देण्याच्या अनुषंगाने देखील चर्चा करण्यात आली. एनटीसी च्या गिरण्यांच्या कामकाजाबाबत देखील चर्चा करण्यात आली.सदर विषय केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडण्याचे आश्वासन वस्त्रोद्योग मंत्र्यांनी दिल्याची माहिती उपसभापती सचिन अहिर यांनी दिली.

    सॉल्ट पॅन जमिनींसंदर्भात कोणताही निर्णय घेताना पर्यावरणतज्ज्ञ, स्थानिक नागरिक आणि संबंधित घटकांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे अहीर यांनी स्पष्ट केले. भविष्यात या जमिनी राज्य सरकारकडे हस्तांतरित झाल्यास प्रकल्पग्रस्त, बेघर नागरिक, गिरणी कामगार आणि इतर वंचित घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची योजना राबविण्यात यावी असे त्यांनी सुचविले.

    दिल्ली दौऱ्यादरम्यान केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकाराने आयोजित विविध आरोग्यविषयक कार्यक्रमात सहभाग घेतल्याची माहिती श्री. अहिर यांनी दिली. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने यूपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहून त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

    या शिष्टमंडळात  उपसभापती सचिन अहिर यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, संजय पाटील, ओमराजे निंबाळकर, श्रीरंग बारणे तसेच अन्य लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.

    00000000

    महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed