Baramati Bypoll: “आता अजितदादा नसल्यामुळे विलीनीकरणाचा प्रश्न उद्भवत नाही. कारण त्यांच्या पक्षातून आणि कुटुंबातून तेच विलीनीकरणासाठी पुढाकार घेणारे व्यक्ती होते,” असंही रोहित पवार म्हणाले.
बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते; मतदान करून बाहेर पडताच रोहित पवारांचं मोठं वक्तव्य(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दीपक पडकर, बारामती: बारामती विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे येथे पोटनिवडणूक होत असून राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात आहेत. या पोटनिवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “बारामतीत भावनिक दृष्टीकोनातून निर्णय घेत आम्ही सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला. पण आमचे पक्ष वेगळे आहेत. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते,” असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
बारामतीत भविष्यात पवार विरुद्ध पवार लढाई होईल का, असा प्रश्न मतदानानंतर रोहित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर ही शक्यता नाकारता येत नसल्याचं रोहित पवार म्हणाले. “अजितदादा असताना पवार विरुद्ध पवार अशी लढाई लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही झाली होती. त्यामुळे २०२९ च्या निवडणुकीतही ही शक्यता नाकारता येत नाही. पवार कुटुंब एकत्र यावं, ही लोकांची इच्छा आहे आणि शेवटच्या काळात अजितदादांचीही ती इच्छा होती. मात्र आम्ही तर विरोधी पक्षात आहोत आणि त्यांचा पक्ष सत्तेत आहे. आमदार आणि कार्यकर्त्यांचा विचार करता सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय सोपा नसतो.”
जय पवार हे २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत बारामतीतून उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. याबाबत प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले की, “कार्यकर्ते आणि पक्षाची काय इच्छा आहे, पक्ष जो निर्णय घेतो ते ऐकावं लागतं. त्यांचा पक्ष वेगळा आहे. बारामतीतून राष्ट्रवादीची उमेदवार कोणाला द्यायची हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. बारामतीत २०२९ जी लढाई होईल ती सर्वपक्षीय लढाई होऊ शकते,” असं त्यांनी म्हटलं आहे.
“जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार लढाई होऊ शकते”
“आमचे पक्ष वेगळे आहेत, जय पवार जर २०२९ ला बारामतीतून उमेदवार असतील तर इकडूनही युगेंद्र पवार उमेदवार असू शकतात. त्यामुळे आमची कितीही इच्छा नसली तरी पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते. असं व्हावं ही लोकांची इच्छा नसली तरी जे पवार कुटुंबाकडे चांगल्या दृष्टीकोनातून पाहत नाहीत, पवार कुटुंबाने लोकांची सेवा करून उभं केलेलं वलय, संपावं अशी काही राज्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांना वाटत आहे की पवार कुटुंबाने एकत्र येऊ नये,” असं म्हणत रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला आहे.
“…तर अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते”
“अजितदादा असताना विलीनीकरण होणार होतं, दादा असताना विलीनीकरण झालं असतं, तर मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो की २०२९ ला अजितदादाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते,” असा दावाही रोहित पवार यांनी केला आहे.
बारामतीकरांना मतदानाचं आवाहन
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदान करावं, असं आवाहन रोहित पवार यांनी केलं आहे. “अजितदादांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करावं. बारामती शहरातील अनेक जणांचे नाव हे दुसऱ्या मतदान केंद्रावर आले आहे. असं असलं तरी तुम्ही कार्यकर्त्यांची मदत घ्या आणि लांबच्या बूथवर नाव असेल तरी मतदान करा. बारामतीकर मोठ्या संख्येने मतदान करून सुनेत्राकाकींना निवडून देतील, असा विश्वास आहे. दादांबद्दल अनेक आठवणी आहेत. दादांसाठी आणि साहेबांसाठी आम्ही लहान असतानाही प्रचार करायचो, सायकल रॅलीमध्ये सहभागी व्हायचो. दादा बोलायला कडक पण मनाने खूप मवाळ होते,” अशा शब्दांत रोहित पवार यांनी आपल्या काकांसोबतच्या आठवणी जागवल्या आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा