धुळे, दि. २: जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. दादासाहेब रावल शिंदखेडा तालुका दूध उत्पादक कृषी पूरक उद्योग सहकारी संघ लिमिटेड, दोंडाईचा संघाच्या नवीन प्रकल्पामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढून दुग्ध व्यवसायाला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.
रावल शिंदखेडा तालुका दूध व दूधजन्य प्रक्रिया प्रकल्प भूमिपूजन सोहळा आज सकाळी पार पडला. यावेळी पालकमंत्री श्री. रावल बोलत होते. यावेळी आमदार मंजुळाताई गावित, आमदार राघवेंद्र पाटील, आमदार अनुपभैय्या अग्रवाल, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी कुलगुरू डॉ. विलास खर्चे, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार,नगरसेविका सुभद्रादेवी रावल, संस्थेचे चेअरमन रघुवीर बागल व्हाईस चेअरमन महेंद्र निकम आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. रावल म्हणाले, सहकार महर्षी दादासाहेब रावल यांनी सन १९६८ मध्ये स्थापन केलेल्या दूध संघाने शिंदखेडा तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य दिले. दुष्काळी परिस्थितीतही दूध व्यवसायामुळे शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाचा आधार मिळाला. राज्यातील अग्रगण्य दूध संघ म्हणून या संघाची ओळख होती. मात्र बदलत्या परिस्थिती व स्पर्धेमुळे संघ अडचणीत आला. आता या संघाचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प करण्यात आला असून नवीन प्रकल्प त्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
ते म्हणाले, जिल्ह्यातील अल्पभूधारक, भूमिहीन व सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय हा उत्पन्नाचा प्रभावी पर्याय आहे. दूध संकलन, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
दूध संघाच्या संचालक मंडळाने संघाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी विकासाभिमुख निर्णय घ्यावेत. यशस्वी दूध संघांच्या धर्तीवर आधुनिक प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून द्यावा, असे आवाहनही पालकमंत्री श्री. रावल यांनी केले.
या नवीन प्रकल्पामुळे दूध संकलन क्षमता वाढण्यास, दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीला चालना मिळण्यास तसेच जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले की, दुग्धजन्य पदार्थांवर प्रक्रिया करून त्यांचे मूल्यवर्धन केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. केवळ दूध उत्पादन करून चालणार नाही, तर त्यावर प्रक्रिया करून विविध दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती आणि प्रभावी विपणन करणे काळाची गरज आहे. नवीन दुग्ध व दुग्धजन्य प्रक्रिया प्रकल्पाची सुरुवात ही महत्त्वाची असून, या माध्यमातून दूध अधिक काळ साठवून त्यापासून विविध दर्जेदार उत्पादने तयार करून देश-विदेशातील बाजारपेठांपर्यंत पोहोचविता येतील. शेळीच्या दुधामध्ये विशेष पोषणमूल्य असून अनेक ग्राहकांकडून त्याला मागणी आहे. शेळीच्या दुधावर प्रक्रिया करून त्याचे योग्य मूल्यवर्धन व प्रभावी विपणन केल्यास शेतकरी आणि दूध उत्पादकांना मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो, असेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पास महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठामार्फत संशोधन, तांत्रिक मार्गदर्शन आणि आवश्यक सहकार्य देण्याची ग्वाही डॉ. पाटील यांनी दिली. यावेळी विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी, दूध संघाचे पदाधिकारी, संचालक, दूध उत्पादक शेतकरी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००
