• Tue. Jun 16th, 2026
    Pune Crime : काळजाचा तुकडा गेला; 11 महिन्यांच्या आदितीचा चुकीच्या उपचारांनी मृत्यू, ससून समितीच्या अहवालानंतर डॉक्टरांवर गुन्हा, पुण्यात खळबळ

    Medical negligence death case in pune : पुण्यात वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. नवी पेठेतील एका रुग्णालयात चुकीच्या उपचारामुळे ११ महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचे ससूनच्या तज्ज्ञ समितीने स्पष्ट केले आहे. याप्रकरणी ४ डॉक्टरांसह ६ जणांवर सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

    पुण्यात चुकीच्या उपचारामुळे ११ महिन्यांच्या मुलीचा मृत्यू, डॉक्टरांवर गुन्हा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : शहरात वैद्यकीय निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, अवघ्या ११ महिन्यांच्या चिमुकलीचा चुकीच्या उपचारांमुळे मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नवी पेठेतील एका खासगी रुग्णालयातील चार डॉक्टर आणि दोन परिचारिका अशा सहा जणांविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये डाॅ. मुकुंद संगमनेरकर, डाॅ. गणेश आरेकर, डाॅ. श्रीधर जाधव, डाॅ. राधा संगमनेरकर, आणि नर्स मनीषा शिंदे तसेच सारिका सुतार, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हनुमान दत्ताराव गिते (वय ३४, रा. हेरंब सोसायटी, बालाजीनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ‘चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यानेच मृत्यू’

    हनुमंत गिते यांच्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी आदिती (वय ११ महिने) हिला उलटीचा त्रास होत असल्याने मे २०२५ मध्ये नवी पेठेतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टर आणि परिचारिकांकडून गंभीर हलगर्जीपणा झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गिते यांच्या म्हणण्यानुसार, मुलीची प्रकृती नाजूक असल्याची जाणीव डॉक्टरांना असूनही योग्य उपचार करण्यात आले नाहीत. उलट चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यानेच तिचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांनी पोलिसांकडे नोंदवला.

    ससूनच्या तज्ञांचा निष्कर्ष

    या गंभीर प्रकरणाची चौकशी ससून रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञ समितीकडे सोपवण्यात आली होती. समितीने केलेल्या तपासात उपचारामध्ये त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय निष्काळजीपणामुळेच बालिकेचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष समितीने नोंदवला.

    गुन्हा दाखल

    त्यानंतर महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम २०२३ अंतर्गत संबंधित डॉक्टर आणि परिचारिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काळे करत आहेत. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा