Pune Airport Latest Update : पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाचे (IAF) एक विमान उतरत असताना त्याचे ‘हार्ड लँडिंग’ झाले. या प्रक्रियेत विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ते धावपट्टीच्या मधोमध अडकून पडले. या घटनेनंतर हवाई दलाने तातडीने धावपट्टी सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद केली.
जीवितहानी नाही
सुदैवाची बाब म्हणजे या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विमानातील सर्व एअरक्रू सुरक्षित असून नागरी मालमत्तेचेही कोणतेही नुकसान झालेले नाही, अशी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान, काही वेळेसाठी धावपट्टीवर अडकलेले विमान आणि अचानक झालेल्या हालचालीमुळे अपघात किंवा विमान कोसळल्याची शक्यता काही काळ वर्तवण्यात येत होती. मात्र, हवाई दलाकडून अशा कोणत्याही अपघाताची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. प्राथमिक माहितीप्रमाणे ही केवळ तांत्रिक बिघाडाची घटना असल्याचे सांगण्यात आले आहे.
Pune Crime : काळजाचा तुकडा गेला; 11 महिन्यांच्या आदितीचा चुकीच्या उपचारांनी मृत्यू, ससून समितीच्या अहवालानंतर डॉक्टरांवर गुन्हा, पुण्यात खळबळ
युद्धपातळीवर दुरुस्तीचं काम
या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्रभर युद्धपातळीवर काम करण्यात आले. विमान धावपट्टीवरून हटवण्यात आले आणि आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली. विमानतळ संचालक संतोष ढोके यांच्या माहितीनुसार परिस्थिती सुरळीत करण्यासाठी ४ ते ५ तासांचा कालावधी लागू शकतो, असे सुरुवातीला सांगण्यात आले होते.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही या घटनेवर लक्ष ठेवून असल्याचे सांगत विमानतळ प्रशासन आणि हवाई दलाशी सातत्याने संपर्कात असल्याची माहिती दिली.
विमानतळावरील परिस्थिती पूर्ववत
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सकाळी पोस्ट करून परिस्थिती पूर्ववत झाल्याची माहिती दिली आहे. धावपट्टीवरील दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सकाळी ७:३० पासून डिपार्चर फ्लाइट्स पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत, तर सकाळी ८:०० पासून आगमन सेवा (Arrivals) सुरू होणार आहेत. संपूर्ण यंत्रणांनी मिळून काम पूर्ण केल्यानंतर विमानसेवा हळूहळू सामान्य होत आहे. दिवसभरात हवाई वाहतूक पूर्णपणे पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान आता पुणे विमानतळावरील धावपट्टी पुन्हा एकदा विमान प्रवासासाठी सज्ज झाली आहे. भारतीय हवाई दलाने (IAF) दलाने ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे की, आता धावपट्टी पूर्णपणे कार्यान्वित झाली आहे. सर्व आवश्यक परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. विमान सेवा अचानक सुरू न करता, टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहे, जेणेकरून वाहतुकीचे नियोजन सुरळीत राहील.
