• Sat. Jun 6th, 2026
    Chhatrapati Sambhajinagar Crime : पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉर, पवन दिवेकर टोळीकडून भरचौकात गोळीबार, नागरिकांमध्ये दहशत

    Gang war and firing in chhatrapati sambhajinagar: शहरातील पुंडलिकनगर परिसरात टोळीयुद्धाच्या वादातून भररस्त्यात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुख्यात गुन्हेगार पवन दिवेकर आणि त्याच्या ‘पीडी कंपनी’ने हनुमान नगर चौकात दोन राऊंड फायर करत दहशत माजवली.

    तोंडात गुटखा, हातात बिअर अन् कंबरेला कट्टा; छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारी चित्रपटासारखा रिअल सीन, गँगकडून भरचौकात गोळीबार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: शहरातील पुंडलिकनगर परिसरातील हनुमान नगर चौकात गुरुवारी रात्री टोळीयुद्धाच्या वादातून भररस्त्यात गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली. सराईत गुन्हेगार पवन दिवेकर आणि त्याच्या पीडी कंपनीने भरवस्तीत दहशतीचे तांडव करत दोन राऊंड फायर केले. सुदैवाने, शेकडो नागरिकांची उपस्थिती असूनही या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

    पवन दिवेकर राहणार न्याय नगर असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, रांजणे आणि साळवे या दोन गटात गेल्या दोन दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमातील वादावरून ठिणगी पडली होती. गुरुवारी रात्री हे दोन्ही गट एकमेकांसमोर आले असता वाद विकोपाला गेला. यावेळी साळवे याने आपल्या मदतीला कुख्यात गुन्हेगार पवन दिवेकर याला बोलावून घेतले.

    सिनेस्टाईल एन्ट्री अन् फायरिंगचा थरार

    नुकताच कारागृहातून बाहेर आलेला पवन दिवेकर हातात बिअरची बाटली घेऊन शिवीगाळ करत घटनास्थळी दाखल झाला. त्याने अत्यंत थंड डोक्याने टपरीवरून गुटखा खरेदी करून तोंडात टाकला आणि त्याचवेळी कंबरेला लावलेला गावठी कट्टा काढून रांजणे गटाला धमकावण्यास सुरुवात केली. रांजणे गटाचा विरोध वाढताच संतापलेल्या दिवेकर याने गर्दीच्या मधोमध उभे राहून हवेत दोन गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात एकच पळापळ झाली.

    Maharashtra TimesNagpur Crime : नागपूरमध्ये खाकीचा धाक संपलाय का? रात्रीच्या गस्तीदरम्यान थेट पीएसआयवर चाकूहल्ला करून पळवली त्यांचीच बुलेट

    पोलिसांची धडक कारवाई

    घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने सायरन वाजवत घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या गाड्या पाहताच पवन दिवेकर आणि त्याचे साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले, मात्र पोलिसांनी साळवे याला ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून आरोपींच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली आहेत.

    कोण आहे ही पीडी कंपनी ?

    गोळीबार करणारा पवन दिवेकर हा पीडी कंपनी नावाची टोळी चालवतो. त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यामध्ये खुनाचा प्रयत्न, मारहाण आणि शस्त्राने हल्ले करणे असे एकूण १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तू जालन्यातील कुख्यात गुन्हेगार गजानन तर याच्या टोळीत काम करत होता. गजानन दौऱ्याचा खून झाला त्या दिवशी तो गजानन दौऱ्याच्या कारमध्ये देखील होता. नुकताच काही दिवसांपूर्वी तो कारागृहातून बाहेर आला होता.सोशल मीडियावर शस्त्रांसह डान्स करण्याचे व्हिडिओ शेअर करून दहशत पसरवण्याचं काम ही टोळी करत आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा