Goregaon NESCO Music Concert : पोलिसांनी विनीतच्या मोबाइलची झाडाझडती घेतली असता, त्याने अनेक जणांना ड्रग्जचे वाटप केल्याचं दिसून आले. त्यांच्याकडून विनीत याच्या खात्यावर पैसेही आले आहेत. त्याचे आयोजक आणि इतरांसोबतही संबंध असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असं पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे आयोजक आणि विनीत यांची समोरासमोर चौकशी करायची असल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं.
नेमकं प्रकरण काय?
या सर्व आरोपींना न्यायालयाने १८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात आणखी दोन आरोपींवर पोलिसांची नजर आहे. गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये ११ एप्रिल रोजी नेस्को आणि इन्स्पायरिंग टाय प्रोडक्शन यांच्या वतीने ‘९९९९९९९९९- टेक्नो इव्हेण्ट’ या संगीत रजनी कार्यक्रमाचे (लाइव्ह म्युझिक कॉन्सर्ट) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ड्रग्जचा ओव्हरडोस झाल्याने बिस्मातसिंह भसीन आणि श्रेया राय या एमबीएच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी विहान उर्फ आकाश समळ, सनी जैन, रौनक खंडेलवाल, बालकृष्णन कुरूप, प्रतीक पांडे आणि आनंद पटेल या सहा जणांना अटक केली. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींची चौकशी केली. तपासादरम्यान, हाती आलेल्या पुराव्यांवरून उल्हासनगर येथील आणि दक्षिण मुंबईतील कॉलेजमध्ये शिकणारा विनीत गेरेलानी हादेखील संपर्कात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही अटक केली. या सर्व आरोपींना काल गुरुवारी बोरिवली येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
Mumbai Concert Tragedy : रौनकने पिवळी गोळी दिली, मग काही आठवत नाही, थेट हॉस्पिटलमध्येच उठले; म्युझिक कॉन्सर्टना नशेचा विळखा, बचावलेल्या तरुणीचा चक्रावणारा जबाब
आधीही नेस्कोत ड्रग्जसेवन
पोलिसांनी अटक आरोपी प्रतिक पांडे याची कसून चौकशी केली असता, त्याने याआधीही नेस्को येथील म्युझिक कॉन्सर्टमध्ये गेल्याचं सांगितलं. मृत तरुणी श्रेया राय आणि इतर मित्र-मैत्रिणींसोबत या ठिकाणी झालेल्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये प्रतीक सहभागी झाला होता. त्यावेळी या सर्वांनी ‘एमडीएमए एक्सटसी’च्या गोळ्या सेवन केल्या, असं पोलिसांनी सांगितलं.
Goregaon NESCO म्युझिक कॉन्सर्टचं रेटकार्ड व्हायरल; 3 हजारांपासून तीन लाखांचं तिकीट, अव्वाच्या सव्वा दर तरीही तोबा गर्दी
विनीतने केले व्यवहार
स्नॅपचॅटद्वारे विनीतने ड्रग्जचे व्यवहार केल्याचं तपासात समोर आलं आहे. ड्रग्जचे पैसे स्वीकारण्यासाठी स्नॅपचॅटवरुनच क्यूआर कोड पाठविण्यात आले. अमली पदार्थ विकून आलेले पैसे त्याच्या खात्यावर आले. त्याने नंतर या गुन्ह्यात हव्या असलेल्या अन्य एका आरोपीला ते पाठविल्याचे पोलिसांनी सांगितले. ड्रग्जची खरेदी-विक्रीच नाही, तर विनीत स्वत:ही ११ एप्रिल रोजी झालेल्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये उपस्थित होता, असंही निष्पन्न झाले आहे.
