Nagpur Murder Case: या प्रकरणी अजनी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत जवळपास १२ अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
तरुणासोबत वाद, लहान मुलांनी थेट हत्येचा कट रचला; ऑनलाइन चाकू मागवत प्लॅन आखला, भररस्त्यात रक्ताचे पाट!(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जादूमहल चौक परिसरात मंगळवारी रात्री घडलेल्या चाकूबाजीच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली असून त्याचा मित्र गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी अल्पवयीन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत युवकाची ओळख सागर गिरीधर सलामे (वय २२) अशी असून तो आठवडी बाजारात भाजी विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. तर जखमी युवक हर्षल उर्फ एलेक्स शिंदे हा त्याचा मित्र असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर आणि एका अल्पवयीन मुलामध्ये सुमारे दहा दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच वादाचा सूड घेण्यासाठी आरोपींनी सागरला संपवण्याची योजना आखली. घटनेच्या रात्री महाप्रसाद कार्यक्रमाच्या बहाण्याने सागरला फोन करून जादूमहल चौकात बोलावण्यात आले. सागर आपला मित्र हर्षलसोबत तेथे पोहोचताच आधीच दबा धरून बसलेल्या १० ते १२ अल्पवयीन युवकांचा टोळीने त्यांना घेरले. यानंतर आरोपींनी लाठ्या, लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांनी दोघांवर हल्ला चढवला. जीव वाचवण्यासाठी सागर पळण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी त्याचा पाठलाग केला आणि नंदिनी मेडिकल स्टोअरजवळ त्याच्यावर वारंवार चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेला सागर घटनास्थळी कोसळला. त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
दरम्यान, हर्षल हा देखील गंभीर जखमी अवस्थेत पळत जाऊन सक्करदारा तलावाजवळ कोसळला. त्याच्या मित्रांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती अजूनही नाजूक आहे. तपासादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली असून मुख्य आरोपीने आधीच खुनाचा कट रचत ऑनलाइन चाकू मागवला होता.
विशेष म्हणजे, या घटनेतील मुख्य आरोपीचे वय अवघे १७ वर्षे असून त्याच्यासोबत १४ वर्षांचा मुलगाही सहभागी असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे शहरात अल्पवयीन तरुणांमध्ये वाढत्या गुन्हेगारीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अजनी पोलीस ठाण्याचे अधिकारी नितीन चंद्र राजकुमार यांनी सांगितले की, प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी आरोपींचा शोध घेतला जात आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही घटना चिंताजनक मानली जात आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा