• Tue. Jun 16th, 2026
    Wardha Heatwave : वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा कहर; शाळा आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर

    राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा कहर बघायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा 40 च्या पार गेला आहे. वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात शाळा आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    वर्धा : विदर्भात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात १६ एप्रिल रोजी अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत. उष्णता लाटेची तीव्रता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

    भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा सतत चढत असून, अनेक ठिकाणी ४० अंशांच्या पुढे नोंदवला जात आहे. विशेषतः अकोला येथे ४४.२ अंश, अमरावती ४४.० अंश आणि नागपूर ४३.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. वर्धा जिल्ह्यातही तापमान ४३.९ अंशांपर्यंत पोहोचले असून, उष्णतेचा प्रचंड तडाखा जाणवत आहे.

    हवामान विभागाने यापूर्वीच वर्धा जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, उष्णलाटेची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला आहे. विशेषतः लहान मुलांना उष्णतेचा अधिक त्रास होण्याची शक्यता असल्याने अंगणवाडी केंद्रेही बंद ठेवण्यात येणार आहेत.

    दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. आवश्यक असल्यासच बाहेर पडावे, तसेच पुरेसे पाणी पिणे, डोक्यावर टोपी किंवा कपडा वापरणे आणि हलके, सैल कपडे परिधान करणे यांसारख्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही उष्णतेची लाट कायम असून, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ येथेही तापमान ४२ अंशांच्या पुढे गेले आहे. पुढील काही दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

    विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत घेतलेल्या या निर्णयाचे पालकांकडून स्वागत करण्यात येत असून, उष्णतेपासून बचावासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

    जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नेमकं काय म्हटलं आहे?

    “ज्याअर्थी, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पुर्वसुचनेनुसार वर्धा जिल्ह्यास 15/04/2026 रोजी यल्लो अलर्ट देण्यात आलेला असून वर्धा जिल्ह्यात उष्मालाटेची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. मागील दोन दिवसापासून वर्धा जिल्ह्यातील अनेक भागात उन्हाची तीव्रता वाढली असून भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार 16/04/2026 रोजी वर्धा जिल्ह्याचे तापमान 43-45°C पर्यंत जाण्याची शक्यता आहे. सदर परिस्थिती विद्यार्थ्यांच्या आरोग्यास अपायकारक ठरू शकते. उष्मालाटेमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये या करिता जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा मधील विद्यार्थ्यांना 16/04/2026 रोजी सुट्टी असणे आवश्यक आहे.”

    “ज्याअर्थी, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत व संदर्भ क्र. २ अन्वये शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहिर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. त्याअर्थी मी, वान्मथी सी, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, वर्धा मला आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम 30 व संदर्भ क्र. २ शासन परिपत्रक नुसार प्राप्त अधिकारान्वये वर्धा जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण वर्धा जिल्हा सीमा क्षेत्रामध्ये दिनांक 16/04/2026, गुरुवार रोजी सुट्टी जाहीर करीत आहे.”

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा