• Mon. Jul 6th, 2026

    नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसह अधिकाऱ्यांनी प्रशासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणे महत्त्वाचे – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 15, 2026
    नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसह अधिकाऱ्यांनी प्रशासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणे महत्त्वाचे – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू – महासंवाद

    विकसित भारतासाठी योगदान द्या – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

    नागपूर, दि. १५ : ‘विनम्रता, संयम आणि संवेदनशीलता हे आदर्श कार्यपद्धतीचे अविभाज्य घटक आहेत. अधिकारी म्हणून आपली जबाबदारी केवळ नियमांची अंमलबजावणी करणे नाही, तर प्रशासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणे ही आहे. न्याय, पारदर्शकता आणि प्रामाणिकतेच्या आधारावर घेतलेले निर्णय शासन व्यवस्थेला मजबूत करण्यासह देशाच्या सर्वांगीण विकासात योगदान देतात’ या शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या अधिकाऱ्यांना साद घालत भविष्यातील वाटचालीसाठी दिशादर्शन केले.

    राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या (एनएडीटीची) ७८ व्या तुकडीच्या दीक्षांत समारंभात त्या आज बोलत होत्या. एनएडीटीच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्याला राज्यापाल जिष्णू देव वर्मा, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अग्रवाल, महासंचालक सीबीचेन के मॅथ्यु, प्रशासकीय सदस्य पंकजकुमार मिश्रा व मान्यवर उपस्थित होते.

    तंत्रज्ञान हे केवळ साधन; आपली खरी ओळख विवेक, प्रामाणिकता आणि नैतिक दृष्टिकोनात

    आपण देशाच्या आर्थिक प्रगतीचे, सामाजिक न्यायाचे आणि सुशासनाचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहात. आगामी काळात आपण डिजिटल अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यवहारांची गुंतागुंत आणि करचुकवेगिरीच्या नव्या पद्धती अशा आव्हानांना सामोरे जाल. या आव्हानांवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक आहे. डेटा विश्लेषण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या क्षमतांना अधिक बळकट करतील; मात्र तंत्रज्ञान हे केवळ साधन आहे. आपली खरी ओळख आपला विवेक, प्रामाणिकता आणि नैतिक दृष्टिकोन यात आहे हे अधिकाऱ्यांनी सतत लक्षात ठेवावे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले.

    एनएडीटी ही देशातील एक आदर्श संस्था आहे. येथे कर प्रणाली, संबंधित कायद्यांच्या शिक्षणासमवेत मूल्यात्मक शिक्षणही दिले जाते. भारताची विकसित राष्ट्राकडे वाटचाल होत असताना एनएडीटीसारख्या संस्थांची जबाबदारी अधिक वाढली असून ही संस्था आपली जबाबदारी समर्थपणे पेलत असल्याचे गौरोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले.
    भारतात प्रत्यक्ष कर संकलनात आता सातत्याने वाढ होत आहे. कर अनुपालनात सुधारणा होत आहे. करदात्यांचा आधार विस्तारत आहे. यामुळे नागरिक आणि प्रशासन यांच्यातील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे दिसते. आयकर अधिनियम, २०२५ जो १ एप्रिल २०२६ पासून लागू झाला असून आपली कर प्रणाली आधुनिक, सुलभ आणि पारदर्शक दिशेने वाटचाल करत आहे. या नव्या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये आपण अग्रणी भूमिका बजावणार आहात. त्याची खरी यशस्विता ही आपल्या पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणीवर अवलंबून असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले.


    विकसित भारतासाठी योगदान द्या – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

    भारतीय महसूल सेवेत महिला अधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे हे अनंददायी चित्र असल्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले. भारताची आज जगाच्या नेतृत्वाकडे वाटचाल सुरू आहे. अशा काळात राष्ट्राच्या उभारणीत सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. तिचा योग्य उपयोग करा, असे आवाहन राज्यपालांनी अधिकाऱ्यांना केले.


    व्यापक जनहिताला डोळ्यापुढे ठेवणे आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

    सरकारी अधिकारी म्हणून निर्णय घेताना व्यापक जनहिताला डोळ्यापुढे ठेवणे आवश्यक असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताच्या संकल्पात भारतीय महसूल सेवा विभाग व अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित महत्त्वाची असल्याचे राज्याचे महसुलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

    भारत झपाट्याने प्रगती साध्य करत आहे. जगात स्वतःची एक भक्कम ओळख आता आपली निर्माण झाली आहे. अशा काळात आपल्या सेवेला तुम्ही सुरुवात करत आहात. प्रगतीच्या परिवर्तनात केंद्रस्थानी आपली अर्थव्यवस्था असून त्या अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणात आपली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या गतिशील वातावरणात कर व्यवस्थेची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचे महसूलमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले.

    प्रारंभी दीप प्रज्वलानंतर राष्ट्रपती तसेच अन्य पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष रवी अग्रवाल यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षणाविषयी माहिती दिली. ७८ व्या तुकडीतील गुणवंत विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचा प्रारंभ तसेच सांगता वंदेमातरम आणि राष्ट्रगीताने झाली.
    00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed