• Mon. Jul 6th, 2026

    अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : प्रभावी अंमलबजावणीसाठी कृषी, सहकार विभाग आणि बँकांचा समन्वय महत्त्वाचा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 6, 2026
    अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : प्रभावी अंमलबजावणीसाठी कृषी, सहकार विभाग आणि बँकांचा समन्वय महत्त्वाचा – महासंवाद

    बुलढाणा दि.६ (जिमाका): राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कृषी विभाग, सहकार विभाग आणि बँकिंग यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत. पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ पारदर्शक, सुलभ आणि वेळेत मिळावा, हा या समन्वित प्रयत्नांचा मुख्य उद्देश आहे.

    योजनेबाबत मार्गदर्शन, आवश्यक कागदपत्रांची माहिती तसेच शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी कृषी विभाग महत्त्वाची भूमिका बजावतो. विविध स्तरांवर जनजागृती करून शेतकऱ्यांना योजनेची अचूक माहिती उपलब्ध करून दिली जाते.

    सहकार विभागामार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, विविध सहकारी संस्था आणि संबंधित यंत्रणांमध्ये आवश्यक समन्वय साधला जातो. योजनेच्या अंमलबजावणीतील प्रशासकीय प्रक्रिया सुरळीत आणि परिणामकारक होण्यासाठी हा विभाग महत्त्वाचा दुवा ठरतो.

    बँकांकडून कर्ज खात्यांची पडताळणी, कर्जाशी संबंधित नोंदींची शहानिशा तसेच आवश्यक आर्थिक माहितीची पूर्तता केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले बँक खाते कार्यरत ठेवणे, केवायसी पूर्ण करणे, आधार क्रमांक संलग्न करणे आणि मोबाईल क्रमांक अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.

    योजनेसंदर्भात कोणतीही अडचण अथवा शंका असल्यास संबंधित कृषी कार्यालय, सहकार विभाग किंवा ज्या बँकेत कर्ज खाते आहे त्या शाखेशी संपर्क साधावा. अप्रमाणित माहिती किंवा अफवांवर विश्वास न ठेवता शासनाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही पात्र शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याबरोबरच शेती क्षेत्र अधिक सक्षम करण्याच्या दिशेने राज्य शासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन, प्रशासन, बँका आणि शेतकरी यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असून, सर्वांनी सक्रिय सहकार्य केल्यास योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचू शकेल.

    00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed