• Mon. Jul 6th, 2026

    संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क आणि सज्ज – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 6, 2026
    संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क आणि सज्ज – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष – महासंवाद

    सांगली, दि. ६ (जि. मा. का.) : हवामान खात्याच्या पावसाच्या इशाऱ्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सर्व पूर्वतयारी पूर्ण केली आहे. संबंधित सर्व यंत्रणा सतर्क असून, संभाव्य पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पूरप्रवण व पूरबाधित जिल्ह्यांच्या सज्जतेचा आढावा मुंबईतून दूरदृष्यप्रणालीद्वारे घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान, कृष्णा व वारणा नद्यांची वाढती पाणीपातळी, बचाव व मदतकार्याची तयारी, स्थलांतराचे नियोजन तसेच विविध विभागांनी केलेल्या पूर्वतयारीची माहिती सादर केली.

    सांगली जिल्ह्यात आज रोजी आपत्तीप्रवण स्थिती नाही, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. घोष म्हणाले, आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने रंगीत तालीम घेऊन नागरिकांना माहिती देण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणचे एक पथक 1 जुलै रोजी दाखल झाले आहे. हे पथक संभाव्य पूरस्थितीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करत आहे. आपत्ती निवारणाच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ती सर्व पूर्वतयारी केली असून वेळोवेळी आवश्यकतेनुसार आढावा घेतला जात आहे. संबंधित सर्व यंत्रणा परस्पर समन्वय राखून आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

    या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथून जिल्हाधिकारी यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, तहसीलदार लीना खरात, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ तसेच, पोलीस अधीक्षक तुषार दोशी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

    सांगली जिल्ह्याची आजची स्थिती अशी

    हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आगामी पाच दिवसात सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता कमी असून, जिल्हा ग्रीन झोन मध्ये आहे. परंतु सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. सांगली विभागाचे आजचे सरासरी पर्जन्यमान 14.6 मि. मी. आहे. आयर्विन पुलाची इशारा पातळी 40 फूट व धोका पातळी 45 फूट आहे. आज रोजी आयर्विन पुलाची पाणीपातळी 12.6 फूट आहे. सद्यस्थितीत वारणा धरण 42 टक्के भरले आहे. धरणाची क्षमता 34.40 टी. एम. सी. असून आज रोजी धरणात 14.59 टी. एम. सी पाणीसाठा आहे.  सांगली जिल्ह्यात दि. 6 जुलै रोजी कृष्णा नदीवरील पाण्याखाली तीन बंधारे असून, त्यामध्ये बहे (ता. वाळवा), सांगली (ता. मिरज), म्हैशाळ (ता. मिरज) यांचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यात जास्तीचा पाऊस शिराळा तालुक्यात पडला असून, मांगले सावर्डे पुलावर पाणी आल्याने, त्या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यायी रस्ता म्हणून मांगले काखे पुलावरून वाहतूक सुरू आहे. या रस्त्याचा वाहतुकीसाठी वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

    00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed