राज्यातील शेतक-यांना निसर्गाचा लहरीपणा सांभाळत शेती करावी लागते आणि त्या शेतीसाठी मेहनत घेऊनही अनेकदा अतिवृष्टी दुष्काळ यामुळे पिकांचे नुकसान होत असते. पीक आले नाही तर उत्पन्न नाही आणि परिणामी शेतीसाठी बँकेकडून घेतलेले कर्ज फेडणे शक्य होत नाही. या मुळे शेतकरी वर्ग सतत चिंतेत असतो. शेतकरी वर्गास नापिकी आणि कर्ज थकणे या दुष्टचक्रात अडकून पडावे लागते.
शेतकरी वर्गास प्राधान्य देणाऱ्या सरकारने यासाठीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ ही जाहिर केली आहे. या रूपाने ही आजवरची सर्वात मोठी आणि राज्यातील ५८ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ देणारी महाकर्जमुक्ती ठरली आहे.
शेतकरी बांधवांना २ लाख रुपयांपर्यंत असणारे कर्ज माफ होणार आहे. ज्यांचे कर्ज २ लाखांपेक्षा अधिक आहे अशा शेतकऱ्यांनी २ लाख रुपयांपेक्षा जादा असलेला थकीत कर्जाची रक्कम भरल्यानंतर त्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. आणि जे शेतकरी कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांचाही विचार या योजनेत झाला आहे. नियमित कर्जाचे हप्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम या कर्जमुक्ती मोहिमेत दिली जाणार आहे.
शासन स्तरावर शेतकरी वर्गास प्राधान्य देण्याची जी भूमिका आहे त्याचाच एक भाग म्हणून याकडे आपणास बघता येईल. शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतानाच पिकाचा विमा घेण्याचा सल्ला दिला जातो आणि त्यांच्या पिकाचा विमा देखील काढला जातो. ही योजना प्रधानमंत्री फसल विमा म्हणून सर्वांना परिचित आहे. या अंतर्गत वेळोवेळी पिकाचे नुकसान आलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी भरपाई दिलेली आहे.
बीड जिल्हा हा मुख्यत्वे शेतीवर आणि अनुषंगिक व्यवसायांवर आधारित आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत शेतकऱ्यांना २ लाखांची कर्ज माफ योजना लाभाचीच ठरणार आहे. मात्र यापूर्वीही शासनाने आपली लक्ष्यात घेऊन वेळोवेळी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती शेतीपीक अनुदान वाटप केलेले आहे. याचाही नोंद यावेळी घेतली पाहिजे.
जिल्ह्यात २०२५-२६ च्या खरिप हंगामात अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी या दोन्हीमुळे जिल्ह्यात शेतीपिकाचे नुकसान झाले होते. त्यासाठी शासनाने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १४५८ कोटी रुपयांहून अधिक रक्कम देऊ केली सोबतच याचवर्षी रब्बी हंगामात पेरणीसाठी अनुदान म्हणून ६५० कोटी रुपये अनुदान दिले. सोबतच पिक विमा भरपाई वेगळी आहे आणि त्यानंतर आता या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी २०२६ याअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यास २ लाख रुपये कर्जमाफी देखील दिली आहे.
शेतकरी हा मुख्य घटक मानुन शेतकरी हित केंद्रीत या सर्व भूमिकेमुळे शासन शेतकऱ्याला नापिकी आणि कर्ज या दुष्टचक्रातून मुक्त करण्यास कटिबद्ध आहे याचीच खात्री शेतकऱ्यांना दिली आहे.
प्रशांत दैठणकर
प्र. उपसंचालक तथा जिल्हा माहिती अधिकारी, बीड
