• Sat. Jun 13th, 2026

    Mumbai Water Supply Disrupted : मुंबईकरांवर जलसंकट! अर्ध्या तासाचा ‘पॉवर कट’ मुंबईकरांना भारी पडला; गिरगाव, खारसह अनेक नळांना खडखडाट, पुरवठा सुरळीत कधी होणार?

    Mumbai Water Supply Disrupted : मुंबईकरांवर जलसंकट! अर्ध्या तासाचा ‘पॉवर कट’ मुंबईकरांना भारी पडला; गिरगाव, खारसह अनेक नळांना खडखडाट, पुरवठा सुरळीत कधी होणार?

    Mumbai News : पडघा वीज उपकेंद्रातील तांत्रिक बिघाडामुळे पिसे आणि पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रांचा पुरवठा खंडित झाला असून मुंबईत २० ते २५ टक्के पाणी कपात जाहीर करण्यात आली आहे. याचा मोठा फटका गिरगाव आणि खार दांडा परिसरातील रहिवाशांना बसला असून नागरिकांचे हाल होत आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुंबईत सध्या उन्हाचा पारा चढलाय, घामाच्या धारा वाहत आहेत आणि अशातच मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळवणारी एक बातमी समोर आली आहे. पडघा वीज उपकेंद्रात झालेल्या एका तांत्रिक बिघाडाने अख्ख्या मुंबईकरांना संकटात टाकलं आहे. पिसे आणि पांजरापूर ही महत्त्वाची जलशुद्धीकरण केंद्रं वीज नसल्याने ठप्प झाली आणि बघता बघता मुंबईच्या पाणीपुरवठ्याचं गणितच बिघडलं. आता या तांत्रिक घोळामुळे पालिकेला शहरात २० ते २५ टक्के पाणीकपात लागू करावी लागली आहे.

    नेमकं काय घडलं?

    मंगळवारी संध्याकाळी ५:४५ ते ६:१५ फक्त ही ३० मिनिटं मुंबईकरांना भारी पडली आहेत. पडघा उपकेंद्रातील वीज पुरवठा या अर्ध्या तासासाठी खंडित झाला, पण त्याचा परिणाम एवढा मोठा झाला की मुंबई टप्पा १ आणि २ चा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला. मुख्य संतुलन जलाशयातील पाण्याची पातळी खालावल्याने आता पालिकेवर कपातीचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. ही पाणीकपात बुधवारी रात्री ९ वाजेपर्यंत कायम राहणार असल्याने मुंबईकरांना पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा लागणार आहे.

    गिरगावात पहाटेच पाणीबाणी

    या तांत्रिक बिघाडाचा सर्वात मोठा फटका गिरगावला बसला. पहाटे ४:३० च्या सुमारास ज्यावेळी गृहिणी पाणी भरण्यासाठी सज्ज असतात, पण आज यावेळी नळाला पाण्याचा पत्ताच नव्हता. “सकाळी कामाची घाई असते, मुलांच्या शाळा असतात, अशा वेळी नळ कोरडे राहिल्याने आमची मोठी धावपळ उडाली,” अशा शब्दांत गिरगावच्या गृहिणींनी आपला संताप व्यक्त केला. ऐन उन्हाळ्यात पाणी नसल्याने जनजीवन पार विस्कळीत झालं आहे.

    खार दांडा कोळीवाड्यात हाल

    खार दांडा कोळीवाडा परिसरात तर आधीच लो-प्रेशरच्या पाण्याची ओरड असते, त्यात या बिघाडाने आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे. स्थानिक नगरसेवक चिंतामणी निवाते यांनी सांगितलं की, “पाणी येतंय पण त्याला प्रेशरच नाही, मग ते लोकांच्या घरापर्यंत पोहोचणार कसं?” वाढत्या उकाड्यामुळे नागरिक आधीच हैराण असताना आता पाण्यासाठी त्यांना वणवण करावी लागत आहे.

    प्रशासनाचा दावा

    पालिका प्रशासनाने ‘परिस्थिती नियंत्रणात आहे’ असं म्हणत रात्री ९ नंतर पुरवठा सुरळीत होईल, असा दावा केला असला तरी तोपर्यंत मुंबईकरांची मोठी परीक्षा पाहणारं हे जलसंकट ठरणार आहे. तांत्रिक बिघाड जरी दुरुस्त झाला असला तरी जलाशयाची पातळी पुन्हा भरून काढायला वेळ लागतोय, तोवर मुंबईकरांना या संकटाचा सामना करावा लागणार आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा