• Sat. Jun 6th, 2026

    Aditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी शिवसेनेचे नेतृत्व करणार? आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होण्याचे संकेत, लवकरच घोषणा शक्य

    Aditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी शिवसेनेचे नेतृत्व करणार? आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होण्याचे संकेत, लवकरच घोषणा शक्य

    Shivsena UBT News:आदित्य ठाकरेंवर दिल्या जाणाऱ्या कार्याध्यक्षपदाच्या जबाबदारीबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी प्रमुख नेत्यांच्या वक्तव्यातून या चर्चेचा बळ मिळत आहे.

    ठाकरेंच्या शिवसेनेत लवकरच मोठी उलथापालथ; आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार? पक्षातील घडामोडींतून संकेत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: आधी विधानसभा निवडणुकीत बसलेला धक्का आणि नंतर झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सत्ता राखण्यात आलेल्या अपयशानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षसंघटनेत प्राण फुंकण्यासाठी युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन १९ जून रोजी होणार आहे. या वर्धापन दिनी आदित्य ठाकरे यांची पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून घोषणा केली जाऊ शकते.

    एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांसह बंड करत वेगळी वाट निवडल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय फटका बसला. शिवसेनेत उभी फूट पडली आणि पक्षाचं नाव आणि चिन्हही ठाकरे यांच्यापासून दूर गेलं. पक्षफुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना चांगलं यश मिळालं. मात्र नंतर विधानसभा निवडणुकीत पक्षाची झालेली सुमार कामगिरी आणि मुंबई महानगरपालिकेत पुन्हा सत्ता खेचून आणण्यात आलेल्या अपयशामुळे पक्षसंघटनेत मरगळ आल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आणि पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या रुपाने युवा नेतृत्व देण्याचा प्रयत्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केला जाणार असल्याचे समजते.

    काही दिवसांपासूनच्या घडामोडींतून मिळाले थेट संकेत

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संघटनात्मक कामात मागील काही दिवसांपासून आदित्य ठाकरे कमालीचे सक्रिय झाले आहेत. शिवसेना भवन इथं होणाऱ्या जिल्हाप्रमुख आणि विभागप्रमुखांच्या बैठकांना उपस्थित राहत ते संघटनेवर आपली पकड मजबूत करत असल्याचं दिसत आहे. आधी अशा बैठकांना आदित्य ठाकरे यांची नियमित उपस्थिती दिसत नसत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातच अशा बैठक होत होत्या. मात्र आता आदित्य ठाकरे हे सर्व संघटनात्मक बैठकांना जातीने उपस्थित राहात असल्याने नव्या जबाबदारीसाठी ते सज्ज झाल्याचे संकेत मिळत आहेत.

    मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सत्ता राखण्यात अपयश आलं असलं तरी विपरीत परिस्थितीतही पक्षाने समाधानकारक जागा मिळवल्या होत्या. या निवडणुकीत आदित्य ठाकरे हे पक्षाचा अजेंडा लोकांपर्यंत पोहोचवण्यात अग्रभागी राहिले होते.

    दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही आदित्य ठाकरेंच्या निवडीबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. “उद्धव ठाकरे हेदेखील कालांतराने शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले होते. जर आदित्य ठाकरे यांचे नाव कार्याध्यक्षपदासाठी समोर येत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. आता तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि पुढील राजकारण तरुणांच्या हातात गेलं पाहिजे,” अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे. त्यामुळे आगामी काळात याबाबत नेमक्या काय घडामोडी घडतात आणि वर्धापन दिनी कार्याध्यक्षपदाची धुरा आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर देण्याची घोषणा होते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा