• Tue. Aug 4th, 2026

    Thane Politics : मुंब्र्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सरशी, एमआयएमचा उमेदवार पराभूत, प्रभाग समितींच्या अध्यक्षपदाची निवडणूक रंगतदार

    Thane Politics : मुंब्र्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सरशी, एमआयएमचा उमेदवार पराभूत, प्रभाग समितींच्या अध्यक्षपदाची निवडणूक रंगतदार

    ठाणे महापालिकेच्या प्रभाग समितींच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली आहे. 9 प्रभाग समितीच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व राहिले आहे. पण मुंब्र्यात शरद पवारांची राष्ट्रवादीची सरशी बघायला मिळाली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    विनित जांगळे, ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या नऊ प्रभाग समितींच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शिवसेना-भाजपचे युतीचे वर्चस्व दिसून आले. या पदांसाठी मंगळवारी महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये नऊपैकी युतीचे आठ सदस्य विविध प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले. तसेच मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य निवडून आले असून त्यांनी एमआयएमच्या उमेदवाराचा पराभव केला.

    ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम पार पडल्यानंतर महापौर, उपमहापौर, सभागृहनेते, विरोधी पक्ष नेते निवड प्रक्रिया पार पडली. त्यानंतर स्थायी समितीसह विविध समित्या आणि प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुका या रखडल्या होत्या. अखेर तब्बल सहा महिन्यांनंतर या निवडणुकांना मंगळवारी मुहूर्त मिळाला.

    या निवडणुकीसाठी ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी महापालिका सचिव मनीष जोशी उपस्थित होते. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, आमदार रविंद्र फाटक आणि राजेश मोरे, पीठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व नवनिर्वाचित प्रभाग समिती अध्यक्षांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

    Thane News

    ‘या’ सदस्यांची निवड

    वागळे प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी एकता भोईर, लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी निर्मला कणसे, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी मिनल संख्ये, वर्तकनगर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी जयश्री डेविड, माजिवडा – मानपाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ ओवळेकर, उथळसर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी नारायण पवार, कळवा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी विजया लासे व दिवा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी दीपक जाधव यांची बिनविरोध निवड झाली.

    एका जागेवर एकतर्फी विजय

    मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी एमआयएमचे नफीस अन्सारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दिपाली भगत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या दोन्ही उमेदवारांमध्ये झालेल्या मतदानात अन्सारी यांना ४ मते, तर भगत यांना १० मते मिळाली. त्यामुळे पीठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी भगत यांना विजयी घोषित केले. भगत यांचे पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, गटनेते अभिजित पवार, नगरसेवक पल्लवी जगताप, सुधीर भगत यांनी अभिनंदन केले.