• Tue. Sep 15th, 2026

वारुड परिसरात स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार – पालकमंत्री जयकुमार रावल – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Apr 14, 2026
वारुड परिसरात स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार – पालकमंत्री जयकुमार रावल – महासंवाद

धुळे, दि. १४ (जिमाका) : वारुड परिसरात विविध उद्योगांच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

शिंदखेडा तालुक्यातील वारुड येथे सामाजिक सभागृह बांधकाम तसेच गुलजार नदीवरील दलित वस्तीला जोडणाऱ्या पुलाच्या बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमास दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती  नारायण पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जिजाबराव सोनवणे, माजी जिल्हा परिषद सभापती संजिवनी सिंसोदे, पंकज कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य नथा वारुडे, बांधकाम विभागाचे अभियंता श्री. बरे व कनिष्ठ अभियंता श्री. सोनवणे यांच्यासह विविध मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री रावल म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दलित वस्तीतील विविध विकासकामांचे भूमिपूजन होत असल्याने समाधान वाटत आहे. वारुड गावातील गोरगरीब कष्टकरी नागरिकांसाठी 20 लाख रुपयांच्या राजमाता मंदिराचे तसेच गुलजार नदीवर दलित वस्तीला जोडणाऱ्या पुलासाठी 25 लाख रुपयांच्या कामांचा समावेश असून एकूण 45 लाख रुपयांची विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.

तसेच वारुड परिसरात विवध उद्योग येत असून या उद्योगांच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यापूर्वीही गावाच्या विकासासाठी नवीन तलाठी कार्यालय, रस्ते, पेवर ब्लॉक, नवीन सभागृह, 25 के.व्ही. ट्रान्सफॉर्मर, पिण्याच्या पाण्याच्या योजना आदी कामांसाठी स्थानिक विकास निधीतून सुमारे 1 कोटी 30 लाख रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच सामान्य माणसाच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

या कार्यक्रमास ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed