Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2026: श्री काळाराम मंदिर सत्याग्रह, धर्मांतराच्या घोषणेसह अस्पृश्य कामगार, महिला व युवक परिषदा घेण्यासाठीही डॉ. आंबेडकरांनी आवर्जून नाशिकची निवड केली.
डॉ. आंबेडकरांच्या अभ्यासकांनी ही बाब पुढे आणली आहे. त्यानुसार डॉ. आंबेडकर १९२३ व १९२६ मध्ये न्यायालयीन कामकाजासाठी नाशिकला आले होते. मात्र, त्याचा कोठे लेखी उल्लेख आढळत नाही. १९२८ पासून मात्र ते सतत नाशिक जिल्ह्यात येत राहिले. त्यांच्या या दौऱ्यांसंदर्भात कागदपत्रे उपलब्ध आहेत. डॉ. आंबेडकर १८ जानेवारी १९२८ रोजी त्र्यंबकेश्वर येथे संत श्री निवृत्तिनाथ यात्रेनिमित्त जाहीर सभेत संबोधित करण्यासाठी नाशिकला आले होते. तेव्हा त्यांनी ‘अस्पृश्यता निवारण हेच चोखोबांचे खरे स्मारक’ या विषयावर प्रभावी मांडणी केली होती. त्यानंतर २६ मे १९२९ रोजी चितेगाव (ता. निफाड) येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमान संरक्षक परिषदेचे अधिवेशन भरले होते. २ मार्च १९३० रोजी ऐतिहासिक काळाराम मंदिर सत्याग्रहासाठी डॉ. आंबेडकर आले होते. हा सत्याग्रह १९३५ पर्यंत चालला.
Nashik Crime : नाशिकच्या TCS मधील प्रकार वेदनादायी; लैंगिक छळाची टाटा सन्सकडून दखल, COO च्या नेतृत्वात चौकशी
डॉ. आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा केली. याशिवाय वडनेर (ता. चांदवड), विंचूर (ता. निफाड), मनमाड (ता. नांदगाव), सटाणा (ता. बागलाण), सिन्नर आदी ठिकाणी भाषणे, परिषदा, कोनशिला अनावरण यानिमित्ताने ते आले होते. ते नाशिकमध्ये १५ ते २५ मे १९४७ असे तब्बल दहा दिवस मुक्कामी होते. या काळात त्यांनी नोटप्रेस, गिरणी कामगारांसाठी सभा घेतल्या. मातोश्री रमाबाई आंबेडकर मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन केले. या दौऱ्यांत त्यांनी केलेली भाषणे ‘बहिष्कृत भारत’, ‘जनता’ या नियतकालिकांत सविस्तर प्रसिद्ध झाली आहेत.
मनमाडला सर्वाधिक भेटी
डॉ. आंबेडकरांनी मनमाडला सर्वाधिक भेटी दिल्या. १२ व १३ फेब्रुवारी १९३८ रोजी जीआयपी रेल्वे अस्पृश्य कामगार परिषदेत त्यांनी ऐतिहासिक भाषण केले होते. त्यानंतर ९ डिसेंबर १९४५ रोजी शेतकरी कामगार फेडरेशन परिषद, १६ जानेवारी १९४९ रोजी जाहीर सभा, १७ नोव्हेंबर १९५१ रोजी विद्यार्थी आश्रमाचे उद्घाटन आदी कारणांसाठी ते मनमाडला आले होते. याशिवाय रेल्वे प्रवासादरम्यानही ते मनमाड स्थानकावर थांबत असत.
Ambedkar Jayanti 2026: नाशिककरांसाठी महत्त्वाचे! उद्या 14 एप्रिलनिमित्त शहरातील वाहतुकीत मोठे बदल, अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?
डॉ. आंबेडकरांचे नाशिकवर नितांत प्रेम होते. त्यांची व भाऊराव गायकवाडांची १६३ पत्रे आहेत. डॉ. आंबेडकरांच्या नाशिकमधील कार्याचे उत्तम ‘डॉक्युमेंटेशन’ भाऊराव गायकवाड, शांताबाई दाणी आदींनी करून ठेवले आहे. – प्रा. गौतम निकम, अभ्यासक
