• Sat. Jun 6th, 2026

    Nashik Crime: नाशिक धर्मांतर प्रकरणामागे महिला ‘मास्टरमाइंड’! गुन्हे नोंद होण्यापूर्वीच मुंबईत बदली; दोन पथके मागावर

    Nashik Crime: नाशिक धर्मांतर प्रकरणामागे महिला ‘मास्टरमाइंड’! गुन्हे नोंद होण्यापूर्वीच मुंबईत बदली; दोन पथके मागावर

    Nashik Conversion Case: नाशिकमधील एका कंपनीतील अत्याचार, विनयभंग धर्मांतराच्या प्रयत्न केल्याच्या प्रकरणात एक महिला ‘मास्टरमाइंड’ असल्याची माहिती समोर आली आहे.

    नाशिक धर्मांतर प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: बहुराष्ट्रीय कंपनीतील अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतराच्या प्रयत्न केल्याच्या प्रकरणात एक महिला मास्टरमाइंड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुन्हे नोंद होण्यापूर्वीच संशयित निदा खान सावध झाल्याने तेव्हापासून पसार आहे. मूळ नाशिकची असलेली निदा हिने काही महिन्यांपूर्वी मुंबईत बदली करून घेतली होती. सध्या संशयित महिला राज्यातील एका दाट लोकवस्तीच्या भागात लपल्याचा एसआयटीला संशय असून, दोन पथके तिच्या मागावर आहेत.

    नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलिसांत एक आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात आठ, असे या प्रकरणांचे नऊ गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये आठ महिला व एक पुरुष फिर्यादी आहे. त्यानुसार संशयित दानिश शेख, आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी हे नाशिकरोड कारागृहात आहेत, तर संशयित निदा खान पसार आहे. संशयित निदा हिनेच कंपनीतील इतर धर्मांतील तरुणींसोबत ओळख प्रस्थापित करून संशयितांना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्याचा एसआयटीला संशय आहे. तिच्यासमवेत आणखी एक तरुणी या गटात होती. मात्र, संशयितांचा अतिरेक वाढल्याने तिने काढता पाय घेत नाशिकहून इतर शहरात बदली केली.

    Maharashtra TimesChhagan Bhujbal: प्रयत्न केले तरच मुख्यमंत्रिपद शक्य; सुनेत्रा पवारांबाबत भुजबळांचे सूचक विधान
    संशयित महिलेने काही तरुणींना विशिष्ट धर्माचा पेहराव चांगला दिसेल, असे म्हणत ‘धर्मसंस्कृती’ लादण्याचा प्रयत्न केला. संशयितांच्या पापाचा घडा भरल्याचा संशय येताच संशयित महिलेनेही बदली करून घेतली. गुन्हे नोंद झाल्यापासून नाशिकसह बदलीच्या ठिकाणाहून निदा पसार असून, पोलिस तिचा शोध घेत आहेत. तिच्या अटकेनंतर या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती अधिक स्पष्ट होणार आहे.

    सर्व संशयित निलंबित
    ‘छळाच्या आणि बळजबरीच्या कोणत्याही प्रकाराबाबत कंपनीचे दीर्घकाळापासून शून्य सहिष्णूतेचे धोरण आहे. आमच्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणी नेहमीच उच्च दर्जाची सुरक्षितता आणि त्यांचे कल्याण सुनिश्चित केले आहे.

    नाशिकमधील प्रकरणाची माहिती मिळताच आम्ही तातडीने कारवाई केली. ज्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे, त्यांना चौकशी प्रलंबित असेपर्यंत निलंबित केले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणांना सहकार्य करीत आहोत. या तपासाच्या निष्कर्षांवर आधारित पुढील कारवाई केली जाईल’, असे संबंधित कंपनीच्या प्रवक्त्यांनी लेखी पत्राद्वारे स्पष्ट केले.

    Maharashtra TimesNashik Crime: तोंड झाकून महिला घरी आली, उकळतं तेल 20 वर्षीय तरुणीच्या अंगावर फेकलं; स्कार्फ काढताच सर्वांनाच धक्का
    ‘एजीएम’ आज न्यायालयात
    एका गुन्ह्यात कंपनीतील असिस्टंट जनरल मॅनेजर (एजीएम) संशयित अश्निनी चैनानी हिला न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असून, आज सोमवारी (दि.१३) तिला न्यायालयात हजर केले जाईल. तिने पीडितांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यासह त्यांना जाणीवपूर्वक ‘वर्कलोड’ दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. इतर संशयितांची पुढील गुन्ह्यांत एसआयटी पोलिस कोठडी मागण्याची शक्यता आहे

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा