• Tue. Jun 16th, 2026

    Pune Politics: पुणे प्रशासनाविरुद्ध सुनेत्रा पवारांची तक्रार; आक्षेपावर तातडीने खुलासा करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश, प्रकरण काय?

    Pune Politics: पुणे प्रशासनाविरुद्ध सुनेत्रा पवारांची तक्रार; आक्षेपावर तातडीने खुलासा करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश, प्रकरण काय?

    PMC Regional Office Restructuring Controversy: आपलाच अध्यक्ष बनविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने क्षेत्रीय कार्यालयांच्या केलेल्या फेररचनेवर थेट सुनेत्रा पवारांनीच आक्षेप घेतल्यामुळे सत्ताधारी भाजपची कोंडी झाली आहे.

    सुनेत्रा पवार देवेंद्र फडणवीस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे महापालिका प्रशासनाने शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालये आणि परिमंडळ विभागांच्या केलेल्या पुनर्रचनेवर थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या आक्षेपांवर तातडीने खुलासा करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेला दिला आहे. या संदर्भातचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला सादर करण्यात यावा, असे आदेशात म्हटले आहे.

    महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या १५ क्षेत्रीय कार्यालये आणि परिमंडळांच्या रचनेमध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत. या प्रक्रियेत भौगोलिक सलगता आणि नैसर्गिक अंतराचा विचार न केल्यामुळे पुणेकरांना दैनंदिन कामांसाठी घरापासून लांब असलेल्या क्षेत्रीय कार्यालयात जावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर या रचनेला स्थगिती देऊन नवीन प्रभागरचना करावी, अशी विनंती सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती.
    Maharashtra TimesAshok Kharat प्रकरणात ED ॲक्शन मोडमध्ये, पुण्यात 3 ठिकाणी छापे, नाशिकमध्ये खरातच्या घराची 12 तासांपासून झाडाझडती
    विश्रांतवाडी व धानोरी या क्षेत्रीय कार्यालयाला पूर्वीप्रमाणे कळस-धानोरी, फुलेनगर-नागपूर चाळ आणि येरवडा हे प्रभाग जोडणे अपेक्षित होते. यापूर्वीच्या तीन निवडणुकांमध्ये याच प्रमाणे क्षेत्रीय कार्यालयाची रचना होती. या वेळी या क्षेत्रीय कार्यालयांत भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष बसविण्यासाठी कळस-धानोरी, फुलेनगर-नागपूर चाळ आणि लोहगाव विमाननगर हे प्रभाग जोडण्याची खेळी खेळली गेली. या राजकारणामुळे वाघोली येथील नागरिकांना रामवाडी जवळ असतानाही येरवड्यात यावे लागणार आहे. तर, कळस येथील नागरिकांना नगर रस्ता येथे जावा लागणार असल्याचा ‘राष्ट्रवादी’चा आक्षेप आहे.

    प्रस्तावित सुधारणा काय?
    प्रशासकीय सुसंगततेसाठी प्रभाग क्रमांक १, २ व ६ हे येरवडा क्षेत्रीय कार्यालयास आणि प्रभाग ३, ४ व ५ हे नगर रोड क्षेत्रीय कार्यालयास जोडणे अधिक सयुक्तिक ठरेल. अशा प्रकारच्या विसंगत रचनेमुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना नाहक प्रवास व मनस्ताप सहन करावा लागणार आहे. ही रचना अत्यंत एकांगी असून, त्यामध्ये भौगोलिक सुसंगतता व लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेतलेले दिसत नाही. तरी, जनहिताच्या दृष्टीने पुणे महापालिका प्रशासनाच्या सदर प्रभागरचनेस तत्काळ स्थगिती देऊन नवीन सुधारित प्रभागरचना करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, अशी विनंती उपमुख्यमंत्री पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
    Maharashtra TimesPune Crime : प्रेमसंबंधाचा गैरफायदा! अल्पवयीन तरुणीचा जबरदस्ती केला गर्भपात, लग्नास दिला नकार
    आक्षेप घेण्यात आलेली क्षेत्रीय कार्यालये
    -विश्रांतवाडी व धानोरी (प्रभाग क्रमांक १ व २): हा भाग नैसर्गिकरीत्या येरवडा क्षेत्रीय कार्यालयाजवळ असताना, त्यांना दूर अंतरावरील नगर रस्ता कार्यालयाला जोडण्यात आले आहे.
    -खराडी-वाघोली (प्रभाग क्रमांक ४) येथील नागरिकांना नगर रस्ता कार्यालय जवळ असताना, त्यांना ते ओलांडून तीन किलोमीटर दूर असलेल्या येरवडा कार्यालयात जावे लागणार आहे.
    Maharashtra TimesPune Accident: हडपसर-सासवड मार्गावर थरकाप उडवणारी घटना; बसचालकाच्या अंगावर कार घातली, फरफटत नेल्याने जागीच मृत्यू!
    राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्षेप
    पुणे महापालिकेतील क्षेत्रीय कार्यालये व प्रभागरचना बदलण्याचा निर्णय हा प्रशासनाच्या नावाखाली करण्यात आलेली राजकीय खेळी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. महापालिका प्रशासनाने घाईघाईत तयार केलेल्या या क्षेत्रीय रचनेमुळे अनेक प्रभागांतील नागरिकांना पूर्वी जवळ असलेली क्षेत्रीय कार्यालये दूर गेल्याची तक्रार करण्यात आली होती. याचा थेट परिणाम महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांवर होत असून, दैनंदिन कामांसाठी त्यांना अधिक अंतरावरील कार्यालयांमध्ये जावे लागणार आहे, असे ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी महापालिकेला दिलेल्या निवेदनात नमूद केले होते.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा