• Sun. Jun 14th, 2026

    शासनाच्या धोरणात्मक निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करून ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ यशस्वी करावे – महसूल राज्यमंत्री योगेश कदम – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 10, 2026
    शासनाच्या धोरणात्मक निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करून ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ यशस्वी करावे – महसूल राज्यमंत्री योगेश कदम – महासंवाद

    सांगली, दि. 10 (जि. मा. का) : राज्य शासनाने गेल्या दीड वर्षात सामान्य जनतेच्या व शेतकऱ्याचे हिताचे अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, प्रशासन व लाभार्थी यांनी समन्वयाने काम करावे. शासनाच्या धोरणात्मक निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान यशस्वी करावे, असे आवाहन गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन योगेश कदम यांनी आज केले.

    खानापूर तालुक्यातील भिवघाट येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. विश्वचंद्रा हॉल येथे आयोजित या अभियानात उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, जिल्हा परिषद बांधकाम सभापती पृथ्वीराज पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, तहसिलदार योगेश टोंपे, गटवविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, जिल्हा परिषद सदस्य ॲड. सई शिंदे, पंचायत समिती उपसभापती सुहास शिंदे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

    शासनाने घेतलेल्या महत्वाच्या धोरणात्मक निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देऊन महसूल राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनता, गरीब कुटुंब व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा मुख्य उद्देश आहे. राज्य शासनाच्या महसूल विभागाने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. तुकडेबंदी कायद्यात बदल, घरकुल बांधकामासाठी 5 ब्रास मोफत वाळू, मुख्यमंत्री बळीराजा पाणंद योजना, ई-पीक पाहणी, असे अनेक निर्णय घेतले. हे निर्णय सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून विविध योजनांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. एकही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी दक्ष रहावे, असे त्यांनी सूचित केले.

    आमदार सुहास बाबर म्हणाले, राज्य शासनाच्या योजनांचा सामान्य नागरिकांना लाभ देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान भिवघाट व आटपाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. आगामी काळात दोन्ही तालुक्यातील प्रत्येक गावात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत जावून शासकीय योजनांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात येत आहे, असे सांगून त्यांनी अधिकाधिक लाभार्थींना लाभ देण्याबाबत सूचित केले.

    प्रास्ताविकात योगेश टोंपे यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा हेतू विषद करून विविध उपक्रम व लाभ वाटपाबाबत माहिती देत शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. गटवविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांनी आभार मानले.

    यावेळी कृषी, महसूल, वनविभाग, आरोग्य विभाग, महिला व बाल विकास आदिसह अन्य विभागांच्या योजनांच्या लाभार्थींना महसूल राज्यमंत्री योगेश कदम व मान्यवरांच्या हस्ते लाभ वाटप करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी महिला बचत गटांच्या स्टॉलला भेट देऊन उत्पादनांची माहिती घेतली. कार्यक्रमास नागरिक, महिला, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमापूर्वी आटपाडी येथेही छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आयोजित करण्यात आले होते. तेथेही विभागांच्या योजनांच्या लाभार्थींना महसूल राज्यमंत्री योगेश कदम व मान्यवरांच्या हस्ते लाभ वाटप करण्यात आले.

    00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed