• Mon. Sep 7th, 2026

महिला व बालविकास विभागाच्या योजनांतून महिलांना मिळतोय मदतीचा आधार – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Apr 10, 2026
महिला व बालविकास विभागाच्या योजनांतून महिलांना मिळतोय मदतीचा आधार – महासंवाद


गरजू व संकटग्रस्त महिलांना महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून निवारा, आर्थिक मदत आणि कायदेशीर मदतीचा आधार मिळत आहे.

१) महिलांसाठी स्वाधारगृह/शक्तीसदन

  या योजनेतून 16 ते 60 वयोगटातील निराधार, निराश्रित, विधवा परितक्त्या, कुमारी-माता, संकटग्रस्त, अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांसाठी आश्रय देवून त्यांचे पुनर्वसन करण्यात येते. सांगली जिल्ह्यामध्ये भगिनी निवेदिता प्रतिष्ठान  सांगलीद्वारे ही योजना राबवण्यात येत आहे. स्वाधारगृहामध्ये महिलांना निवास, भोजन, शिक्षण प्रशिक्षण, व्यावसायिक शिक्षण आदि सोयीसुविधा मोफत उपलब्ध आहेत.

    या संस्थांमध्ये महिलेस संस्थेच्या अधीक्षकाकडे स्वत: अर्ज करुन मोफत प्रवेश घेता येतो किंवा जिल्हा महिला बालविकास कार्यालय तसेच पोलीस कार्यालय, सामजिक संस्था किंवा समाजसेवक यांच्या मार्फत प्रवेश घेता येतो.

पत्ता : भगिनी निवेदिता प्रतिष्ठान सांगली संचलित स्वाधारगृह, जुने पोलिओ सेंटर स्कायलर्क स्कूलजवळ  यशवंतनगर सांगली, संपर्क क्रमांक – 8237935546/9272195069

२) सखी निवास – नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतिगृह 

    भगिनी निवेदिता प्रतिष्ठान संचलित नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतिगृह, सांगली व लठ्ठे एज्युकेशन सोसायटी श्रमिक महिला वसतिगृह अशी दोन वसतिगृहे नोकरी करणाऱ्या महिलांसाठी सांगली येथे चालविण्यात येतात. ही योजना नोकरी करणाऱ्या एकट्या, अविवाहित, विधवा, घटस्फोटित, विभक्त, पती बाहेरगावी असलेल्या स्त्रियांच्या संरक्षणाच्या दृष्टीने निवाऱ्याची सोय करण्यासाठी राबवली जाते. यासाठी महिलेचे मासिक उत्पन्न महानगरासाठी रूपये ५०००० /- आणि इतर शहरांसाठी रुपये ३५,०००/- पेक्षा जास्त नसावे. यामध्ये ज्या महिलांना मुले आहेत, त्यांची 18 वर्षापर्यंतची मुलगी व 12 वर्षापर्यंतच्या मुलास सोबत ठेवता येते. या वसतिगृहात राहणाऱ्या महिलेकडून एका बेडच्या रूमसाठी तिच्या स्थूल वेतन मानधनाच्या 15 टक्के, दोन बेडच्या रुमसाठी 10 टक्के इतके भाडे तसेच डॉरमेटरीसाठी ७.५ टक्के इतकी रक्कम आकारण्यात येते.

पत्ता : १) भगिनी निवेदिता प्रतिष्ठान संचलित नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतिगृह, गणेशदुर्ग राजवाडा, पटवर्धन हायस्कूलच्या शेजारी, सांगली संपर्क क्रमांक – 0233-2373273, 7719990368

२) लठ्ठे एज्युकेशन सोसायटी श्रमिक महिला वसतिगृह व बाल संगोपन केंद्र, बालाजी मिल रोड, उत्तर शिवाजी नगर सांगली. संपर्क क्रमांक – 0233-3553800

३) समुपदेशन केंद्र

या योजनेतून कौटुंबिक हिंसाचाराच्या वाद-विवादात महिलांना समुपदेशन सेवा दिली जाते. १) भगिनी निवेदिता प्रतिष्ठान संचलित महिला समुपदेशन केंद्र सांगली शहर पोलीस ठाणे, सांगली, २) प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मिरज संचलित महिला समुपदेशन केंद्र इस्लामपूर पोलीस ठाणे, ३)जनसेवा प्रतिष्ठान विटा संचलित महिला समुपदेशन केंद्र विटा पोलीस ठाणे आवार, विटा ४) प्रकाश शिक्षण प्रसारक संस्था तासगाव संचलित महिला समुपदेशन केंद्र तासगाव पोलीस ठाणे आवार, तासगाव या चार ठिकाणी महिला समुपदेशन केंद्रे कार्यरत आहेत. या योजनेतून 2024-25 मध्ये 574 व 2025-26 मध्ये 267 महिलांचे समुपदेशन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.

४) अभय केंद्र

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कौटुंबिक हिंसाचार महिला संरक्षण अधिनियमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. अभय केंद्र संबंधित पंचायत समिती आवारातील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात कार्यरत आहे.

५) वन स्टॉप सेंटर

संकटग्रस्त महिलांना आवश्यक वैद्यकीय, कायदेशीर व मानसिक आधार एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी ‘सखी वन स्टॉप सेंटर’ योजना आहे. महिलांवर होणारे शारीरिक व मानसिक अत्याचार, आर्थिक छळवणूक, समाजाकडून होणारा त्रास, अवहेलना अशा संकटांसाठी त्या महिलेस व तिच्या कुटुंबियास न्याय देण्यासाठी संकटग्रस्त महिलांसाठी आवश्यक उपचार व मदत एकाच छताखाली दिली जाते. यासाठी वुमन हेल्पलाईन 181 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करुन मदत मिळवता येते.

६) तक्रार समिती 

कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षा व सुरक्षित वातावरणात काम करता यावे. यासाठी कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अधिनियमातील तरतदीनुसार ज्या आस्थापनांमध्ये 10 किंवा 10 पेक्षा अधिक अधिकारी / कर्मचारी यांचा समावेश असेल अशा प्रत्येक शासकीय / अशासकीय (खाजगी) आस्थापना /कार्यालयात अंतर्गत तक्रार समिती गठीत करायची आहे. कामाच्या ठिकाणी महिलांना लैंगिक अत्याचार संबंधात काही समस्या असतील तर महिलांनी या समितीशी संपर्क साधायचा आहे.

७) शासकीय  व स्वयंसेवी बालगृहे 

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ मधील कलम २ (१४) मध्ये नमूद केलेल्या काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या ० ते १८ वर्षे वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रित, बेघर, विशेष काळजीची गरज असलेली, एचआयव्ही बाधित बालके, संकटग्रस्त व अत्याचारीत बालके, दुर्धर आजारी पालकांची मुले, कैद्यांची मुले अशा काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या १८ वर्षे वयापर्यंतच्या मुलांना बालगृहामध्ये प्रवेश देण्यात येतो. बालगृहात बालकांना अन्न, वस्त्र, निवारा, संरक्षण, वैद्यकीय सेवा, शिक्षण, प्रशिक्षण, समुपदेशन इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. जिल्हा महिला बालविकास कार्यालय सांगली अंतर्गत जिल्ह्यात असे एकूण मुले व मुली मिळून 11 बालगृह, व एक शिशुगृह कार्यरत आहेत. त्यापैकी  मुलींसाठी 8 बालगृहे कार्यरत आहेत. समस्याग्रस्त बालकांच्या मदतीसाठी 1098 ह्या टोल फ्री हेल्प लाईन नंबरवरसंपर्क साधता येतो.

9)      क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना 

या योजनेतून एकल महिला, विधवा, परितक्त , निराधार महिला अशा महिलांच्या बालकांना प्रति महिना 2250 रुपये अनुदान दिले जाते.

महिला व बालविकास विभागाच्या सर्व योजनांच्या अधिक माहितीसाठी पत्ता व संपर्क क्रमांक – महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, तळमजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, विजयनगर चौक, सांगली संपर्क क्रमांक – 0233-2600043

 

महत्त्वाचे संपर्क क्रमांक

वुमन हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक – 181

समस्याग्रस्त बालकांच्या मदतीसाठी टोल फ्री हेल्प लाईन – 1098

 

संकलन संप्रदा बीडकर

जिल्हा माहिती अधिकारी, सांगली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed