• Sun. Jun 14th, 2026

    वॉटर स्लाईडवरुन घसरताना अपघात, पुण्यात 37 वर्षीय महिला गंभीर जखमी

    वॉटर स्लाईडवरुन घसरताना अपघात, पुण्यात 37 वर्षीय महिला गंभीर जखमी

     पुणे

     हसत-खेळत सुरू झालेली सहल… पाण्यातील मजा… आणि अचानक घडलेली एक भीषण घटना! एका महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त करुन गेली. ही धक्कादायक घटना घडली आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात मोराची चिंचोली येथे. वॉटरपार्कमध्ये घडलेल्या अपघाताने एका कुटुंबाचं जीवन अक्षरशः बदलून टाकले आहे.

    मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रात वॉटर स्लाइडवरून घसरताना पाण्याची पातळी कमी असल्याने झालेल्या अपघातात ३७ वर्षीय महिलेच्या पाठीच्या मणक्याचे चार तुकडे झाले. त्यामुळे या महिलेचे अर्धे शरीर निकामी झाले असून, या प्रकरणी पर्यटन केंद्राचा मालक व व्यवस्थापकावर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    नेमकं काय घडलं?

    शिरुर तालुक्यातील करंदी गावातील ३७ वर्षीय अश्विनी संदीप नप्ते या आपल्या कुटुंबासोबत सहलीचा आनंद घेण्यासाठी जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रात आल्या होत्या. वॉटर स्लाइडचा अनुभव घेत असताना त्या वेगात खाली येत होत्या. मात्र, स्लाइडच्या शेवटी पुरेसे पाणी नसल्याने त्या जोरात आपटल्या आणि काही क्षणांतच सर्व काही बदलले.

    त्या बेशुद्ध पडल्या अन्…

    अपघात घडताच त्या बेशुद्ध पडल्या. आसपासच्या लोकांमध्ये गोंधळ उडाला. मदतीसाठी धावपळ सुरू झाली, पण वॉटर पार्कमध्ये तातडीची वैद्यकीय सुविधा किंवा रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. शेवटी त्यांना खाजगी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले.

    डॉक्टरांच्या तपासात धक्कादायक बाबी समोर

    डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आले. महिलेच्या पाठीचे चार मणके तुटले होते. या गंभीर दुखापतीमुळे त्यांच्या शरीराचा अर्धा भाग कायमस्वरूपी निकामी झाला आहे. एका क्षणात आनंदाचे रूपांतर आयुष्यभराच्या वेदनेत झाले.

    पर्यटकांच्या जीवाशी खेळ?

    या घटनेमुळे वॉटरपार्कमधील सुरक्षेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पर्यटकांच्या जीवाशी खेळ तर होत नाही ना? अशी चर्चा आता जोर धरत आहे.

    मालक आणि व्यवस्थापकविरोधात गुन्हा

    दरम्यान, किरण नप्ते यांच्या तक्रारीवरून शिरूर पोलीस ठाण्यात वॉटर पार्कच्या मालक आणि व्यवस्थापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग करत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed