• Sun. Jun 7th, 2026

    लोकलने चुकवला थांबा! भाईंदर स्थानक सोडून दोन किलोमीटर पुढे थांबली ट्रेन; प्रवाशांवर रुळांवर उड्या मारण्याची वेळ

    लोकलने चुकवला थांबा! भाईंदर स्थानक सोडून दोन किलोमीटर पुढे थांबली ट्रेन; प्रवाशांवर रुळांवर उड्या मारण्याची वेळ

    Train Misses Bhayander Station: काही दिवसांपूर्वीच मध्य रेल्वेवर एसी लोकलने भांडुप स्थानकातील थांबा चुकवल्याची घटना घडली होती. आता अशीच एक घटना पश्चिम रेल्वेच्या विरार-चर्चगेट लोकलदरम्यान घडली आहे. पश्चिम रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकलची संख्या कमी असून भाईंदर स्थानकाचा थांबा चुकवल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: पश्चिम रेल्वेच्या विरार-चर्चगेट १५ डबा लोकलने भाईंदर स्थानकाचा थांबा चुकवल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. ही लोकल फलाट सोडून दोन किलोमीटर पुढे जाऊन थांबली. यामुळे संतप्त प्रवाशांनी मागून येणारी एसी लोकल काही काळ रोखून धरली. अखेर प्रवाशांना वेळेवर कामाच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी या एसी लोकलमधून प्रवासाची मुभा देण्यात आली.

    जलद लोकलमध्ये गर्दी वाढली

    भाईंदर स्थानकातून १५ डबा जलद लोकलची संख्या मर्यादित आहे. त्यातच जलद लोकलनंतर एसी लोकल धावत असल्याने प्रवाशांना साध्या लोकलच्या प्रतीक्षेत आणखी वाढ होते. वाढत्या उन्हाचा त्रास टाळण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांचा जलद लोकल पकडून लवकर प्रवास संपवण्याकडे कल असतो. यामुळे जलद लोकलला गर्दी वाढती आहे.Maharashtra TimesMumbai Metro 9: पहिल्याच दिवशी ‘हाऊसफुल्ल’! दहिसर-काशीगाव मेट्रोला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद, स्थानकांवर गर्दी; बाहेर पडण्यासाठी रांगा

    विरारहून ही १५ डबा लोकल सकाळी १० वाजून ४४ मिनिटांनी दादरकडे रवाना झाली. लोकलला वसई रोड, भाईंदर, दहिसर, अंधेरी आणि दादर असे थांबे होते. लोकलने वसई रोड थांबा घेतल्यानंतर, ती वेगात रवाना झाली. या वेगातच भाईंदरचा थांबा चुकवून लोकल पुढे गेली. ही चूक मोटरमनच्या लक्षात येताच त्याने लोकल थांबवली. मात्र तोपर्यंत भाईंदर स्थानकातील फलाट बराच मागे गेला होता. स्थानकापुढे लोकल थांबल्यावर प्रवाशांनी रुळांवर उड्या मारत रुळांवरून पायपीट करत रेल्वे स्थानक गाठले.

    जलद लोकल पकडण्याच्या तयारीत असलेले भाईंदर स्थानकातील प्रवासी लोकल न थांबल्याने गोंधळले. एकीकडे डोळ्यांसमोरून गेलेली जलद लोकल आणि कार्यालयात वेळेवर पोहोचण्याची घाई यांमुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली. जलद लोकल थांब्याची रीतसर उद्घोषणा होऊनदेखील गाडी थांबली नाही. दरम्यान, याच फलाटावर विरारहून चर्चगेटकडे जाणारी एसी जलद लोकल आली. संतप्त प्रवाशांनी ही एसी लोकल फलाटावर रोखून धरली.

    Maharashtra TimesMumbai Local: 15 डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढणार, वांद्रे स्थानकावरूनही सुरू होणार; पश्चिम रेल्वेवर प्रवास सुखकर

    चौकशीचे आदेश

    दरम्यान एसी लोकलचे दरवाजे बंद होत नसल्याने स्थानकातील रेल्वे कर्मचाऱ्यांनीदेखील फलाटावर धाव घेतली. आमच्याकडे एसी लोकलचा पास नाही. मात्र आम्हाला कार्यालयात वेळेवर पोहोचायचे असल्याचे सांगत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. अखेर प्रवाशांना एसी जलद लोकलमधून प्रवासाची मुभा दिल्यावर वाद निकाली निघाला. विरार-दादर १५ डबा लोकलने भाईंदर थांबा का चुकवला, याबाबत पश्चिम रेल्वेने चौकशीचे आदेश दिले आहेत.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा